विधान भवनातून : आँखो आँखो में… अजित पवारांच्या टिपणीने हास्यकल्लोळ! | पुढारी

विधान भवनातून : आँखो आँखो में... अजित पवारांच्या टिपणीने हास्यकल्लोळ!

उदय तानपाठक
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द केली गेली आणि काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. विधिमंडळातील काँग्रेसचे आमदारही मागे कसे राहतील? त्यांनी आज, शुक्रवारी पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले. राहुल गांधींच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा काँग्रेसचे आमदार देत असताना, गुरुवारीच भाजपच्या आमदारांनी राहुल गांधींच्या निषेधार्थ आंदोलन केल्यानंतर आपणच त्यास हरकत घेतली होती, हे या आमदारांच्या लक्षात आले आणि मग खोके सरकार, बोके सरकार, अशा घोषणा सुरू झाल्या. इतके दिवस उद्धव ठाकरे गटाचे आमदार ज्या घोषणा देत होते, त्याच काँग्रेसकडून दिल्या जात असताना गंमत वाटत होती. बराच वेळ घोषणा दिल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे माध्यमांना बाईट द्यायला सरसावले आणि मग बाकीच्या आमदारांनी काढता पाय घेतला.

विधिमंडळाचे अधिवेशन उद्या, शनिवारी संपेल. सत्ताधारी युती सरकारने जाहीर केल्यानुसार तीन पूर्ण आठवड्यांचे अधिवेशन घेतले. विरोधकांना अनेकदा संधी असूनही सरकारला कोंडीत पकडता आले नाही. हे अधिवेशन कधी संपतेय, असे विरोधी पक्षांना वाटत असल्याचे अनेक नेत्यांच्या बोलण्यातून जाणवत होते. आता तीन आठवडे कामकाज करण्याचा निर्धार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पूर्ण केला आहे.

आज अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्षांनी दिला होता. अजित पवारांनी हा प्रस्ताव मांडला. अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. गृह खात्यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांच्यावर गुदरलेल्या प्रसंगाचा उल्लेख करून सर्वच आमदारांनी आपल्या घरात कोण येतो- जातो यावर लक्ष ठेवायला हवे. आज फडणवीस यांच्यावर आलेला प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो, सरकारनेही आम्हाला वेळोवेळी आमच्याकडे कोण येतो जातो याची माहिती द्यायला हरकत नाही, हे गुन्हेगार कधी, कुठे जातील याचा नेम नाही, असे पवार म्हणाले. हल्ली व्हिडीओ कॉल करून त्याचे स्क्रीन शॉट घेतले जातात आणि त्यावरून ब्लॅकमेल केले जाते, त्यामुळे अमदारांनी असे व्हिडीओ कॉल घेऊ नयेत आणि समजा घेतलेच तर आपला चेहरा त्यावर दाखवू नये, अशी सूचना अजित पवारांनी केली. मुख्यमंत्र्यांनीही

डोळा मारला; पण….

सोशल मीडिया अत्यंत प्रभावी झाल्याने आजकाल राजकारण्यांना कोणत्याही गोष्टीची सूट राहिलेली नाही. आपण चुकून डोळा बंद केला तरी डोळा मारला डोळा मारला म्हणून मीडियावाले दाखवत राहतात, असे सांगून अजित पवार यांनी परवा उद्धव ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्सच्या वेळी कुणाला तरी डोळा मारल्याची बातमी कशी झाली, याचे वर्णन केले. आजदेखील आपण पाच-सहा नेते मुख्यमंत्र्यांसोबत बसलो असताना मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंना डोळा मारला. तिथे कॅमेरे नव्हते म्हणून बरे नाही, तर अनर्थ झाला असता, अशी मिश्कील टिपणी अजित पवार यांनी केली आणि सभागृहात हशा पिकला. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस! विरोधक तो गाजवण्याच्या बेतात आहेत. बघुया काय होते ते!

Back to top button