विधान भवनातून : मंत्र्यांच्या गैरहजेरीने सरकारची नामुष्की! | पुढारी

विधान भवनातून : मंत्र्यांच्या गैरहजेरीने सरकारची नामुष्की!

लक्षवेधीसाठी आज सभागृहात मंत्र्यांची गैरहजेरी चांगलीच गाजली. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना संबंधित मंत्र्याने सभागृहात उपस्थित राहायला हवे, असा दंडक आहे. आमदारांनी दिलेल्या लक्षवेधी सूचनांना न्याय देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांंनी विशेष बैठक सकाळी साडेनऊ वाजता घेतली. या बैठकीत आठ लक्षवेधी सूचनांवर चर्चा होणार होती. मात्र, संबंधित मंत्रीच गैरहजर असल्याने यापैकी सात लक्षवेधी सूचना पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली. या प्रकारामुळे संतापलेल्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत सरकारला चांगलेच धारेवर धरले. मंत्र्यांना ‘जनाची नाही, मनाची तरी लाज आहे का?’ असा हल्लाबोल करताना त्यांनी संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही सोडले नाही.

या सरकारमध्ये मंत्री झालेले अनेक जण कामकाजाच्या बाबतीत फारसे गंभीर नाहीत, हे खरे आहे. मंत्रालयात तर फार कमी मंत्री उपस्थित असतात. बरेच जण आपल्या बंगल्यावरूनच कारभार हाकतात. ज्यांना मुख्यमंत्री शिंदे सोन्यासारखी माणसे म्हणतात, त्यांना अशा मंत्र्याला भेटायचे म्हणजे मोठ्या दिव्यातून वाट काढावी लागते. विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना तरी सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहणे मंत्र्यांवर बंधनकारक आहे. ते उपस्थित राहतील, याची जबाबदारी संसदीय कार्यमंत्र्यांची आहे. मंत्र्यांच्या गैरहजेरीमुळे कामकाज पुढे ढकलण्याची वेळ येणे ही लाजिरवाणी बाब आहे. भाजपचे कालिदास कोळंबकर आणि शिवसेनेचे संजय शिरसाट या आमदारांनीही स्वतःच्याच मंत्र्यांवर ताशेरे ओढताना मनातली खदखद व्यक्त केली. मंत्रिपदासाठी पुढे पुढे करणारे ती मिळाल्यावर मात्र कर्तव्य बजावत नाहीत, अशा तक्रारी या आमदारांनी केल्या.

यानिमित्ताने विधिमंडळ सचिवालयाच्या कारभाराबद्दल बोलायलाच हवे! ऑर्डर ऑफ द डे, म्हणजे कार्यक्रमपत्रिका आदल्या दिवशी वेळेत मिळाली, तर मंत्र्यांना दुसर्‍या दिवसाच्या कामकाजाची तयारी करता येते. ब्रिफिंग घेता येते. ही ऑर्डर रात्री दहा-अकरा वाजेपर्यंत मिळत नाही, अशा मंत्र्यांच्याही तक्रारी आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हीच व्यथा मांडली. सभागृह उशिरापर्यंत चालणार असेल, तर किमान कामकाजपत्रिकेची असुधारित प्रत तरी मंत्री कार्यालयाला मिळावी, अशी विनंती त्यांनी अध्यक्षांना केली.
मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे कामकाज पुढे ढकलावे लागल्याबद्दल उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली. यापुढे अपवादात्मक परिस्थिती सोडली, तर सर्व मंत्री सभागृहात उपस्थित राहतील, तशा सूचना त्यांना दिल्या जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शेरोशायरीचा मुकाबला!

अर्थसंकल्पावर बोलताना राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून,
तुम इतना जो मुस्कुरा रहे हो
क्या गम है जिसको छुपा रहे हो
आँखों में नमी हँसी लबों पर
क्या हाल है क्या दिखा रहे हो…
जयंत पाटलांच्या या शायरीला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले. सत्ता गेल्याने याद आ रही हैं… याद आने से तेरे जाने से, जान जा रही है… अशी अवस्था जयंत पाटील यांची झाली आहे, असा प्रतिटोला फडणवीस यांनी लगावला!
राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीका करताना शायरी पेश केली होती.
इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं,
मज़ा तो तब हैं जब खुशबु आपके किरदार से आये
असे धनंजय मुंडे म्हणाले होते.
त्यावर फडणवीसांनीही शायरीतून उत्तर दिलं.
दुआ करो कि सलामत रहे मेरी हिम्मत
यह एक चिराग कई आँधियों पे भारी है
मुश्किलें जरूर है, मगर ठहरा नहीं हूँ मैं
मंज़िल से जरा कह दो, अभी पहुंचा नहीं हूँ मैं
सभागृहात अशी शेरोशायरी सुरू असताना विधिमंडळाच्या प्रांगणात ख्यातनाम गायक नितीन मुकेश यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.

 -उदय तानपाठक

Back to top button