‘ईडी’कडून हसन मुश्रीफ यांची 8 तास चौकशी | पुढारी

‘ईडी’कडून हसन मुश्रीफ यांची 8 तास चौकशी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : माजी ग्रामविकासमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बेलार्ड पियर येथील कार्यालयात चौकशीला हजर राहिले. ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी तब्बल आठ तास त्यांची कसून चौकशी केली. दरम्यान, ‘ईडी’ चौकशीला हजर राहताच मुश्रीफांनी ‘ईडी’ला एक पत्र दिले आहे. या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, मुश्रीफांचा जबाब सीसीटीव्हीच्या मार्फत ऑडिओ/व्हिडीओ रेकॉर्डिंगमध्ये होत असल्याची माहिती मुश्रीफांच्या वकिलांनी दिली आहे.

आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावरून आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात मनी लाँडरिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ‘ईडी’ तपास करत आहे. ‘ईडी’ने गेल्या शनिवारी मुश्रीफांच्या घर, कार्यालयावर छापेमारी केल्यानंतर त्यांना सोमवारी ‘ईडी’च्या मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मुश्रीफांनी याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ‘ईडी’च्या मुंबईतील कार्यालयात हजर झालेले मुश्रीफ सुमारे दीड तास ‘ईडी’ कार्यालयात होते.

मुश्रीफांना बुधवारी पुन्हा चौकशीला बोलावण्यात आले. त्यानुसार बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते चौकशीला हजर राहिले. यावेळी त्यांच्यासोबत दोन वकील हजर होते. रात्री साडेआठ वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. आठ तासांच्या चौकशीअंती मुश्रीफ ‘ईडी’ कार्यालयातून बाहेर पडले. त्यांना पुन्हा सोमवारी दुपारी 12 वाजता चौकशीला बोलावण्यात आले आहे. ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी 40 हून अधिक प्रश्न मुश्रीफांना विचारल्याची माहिती मिळते. ‘ईडी’च्या अधिकार्‍यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली असल्याचे मुश्रीफांनी सांगितले.

Back to top button