मेट्रो धावणार आता ‘बांबूच्या वनात’ ! | पुढारी

मेट्रो धावणार आता 'बांबूच्या वनात' !

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मेट्रो प्रकल्प राबवताना नवीन तंत्रज्ञानावर भर दिला जात आहे. त्याचबरोबर पर्यावरणाची जपणूक करण्याचेही प्रयत्न होत आहेत. यादृष्टीने एमएमआरडीए एक अनोखा उपक्रम राबवणार आहे. यापुढील मेट्रो मार्गात बांबूचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

मेट्रो २ ब आणि मेट्रो ४ मार्गात बांबू प्रयोग केला जाणार आहे. या प्रयोगाची संकल्पना नुकत्याच झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत मांडण्यात आली आणि त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मेट्रो मार्गात बांबूचा वापर कशा पद्धतीने करता येईल, फलाटाच्या कोणत्या भागात बांबूचे काम करता येईल, यादृष्टीने विचार सुरू आहे.

फलाटांचे प्रवेशद्वार, सिलिंग, जिने, फलाटावरील आसनव्यवस्था, खिडक्या, दारांच्या चौकटी आदी ठिकाणी बांबूचा वापर केला जाऊ शकतो. बांबू हे थंड असल्याने फलाटाच्या आतील वातावरण संतुलित राहण्यास मदत होऊ शकते.
फक्त बांधकामच नाही, तर सजावटीच्या दृष्टीनेही बांबूचा वापर केला जाणार आहे. बांधकामाच्या अन्य साहित्याच्या तुलनेत बांबू स्वस्त आणि टिकाऊ असतो. शिवाय लवचिक असल्याने त्याचा विविध प्रकारे उपयोग करून घेता येतो. बांबू हे इंजिनिअरिंग क्षेत्रातील आजच्या घडीचे नवे ‘वुड प्रॉडक्ट’ मानले जाते.

  • मेट्रो मार्गात बांबूचा वापर करण्याच्या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद मिळल्यानंतर आता प्रत्यक्षात बांबूचा कशाप्रकारे वापर करता येईल, याचा आराखडा तयार केला जाईल. फलाटाच्या कोणत्या भागात बांबूचा वापर करून नेमके काय करता येईल, प्रवेशद्वार कसे बनवता येतील, अशा सर्व बाबींचा विचार करून मेट्रो मार्गात बांबूचा वापर सुरू होईल. रेल्वेच्या या निर्णयामुळे बांबू उद्योग व्यवसायाला चालना मिळणार आहे.

Back to top button