अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार, मदतनीसांना एक हजार रुपयांची वाढ करू! | पुढारी

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार, मदतनीसांना एक हजार रुपयांची वाढ करू!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार तर मदतनीसांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ केली जाईल, अशी ग्वाही राज्य सरकारने दिली आहे. मात्र, ही वाढ पुरेशी नसल्याची नाराजी अंगणवाडी संघटनांनी केली आहे.

मुंबईतील आझाद मैदानामध्ये आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मांडल्या.

कृती समितीच्या पदाधिकारी ज्योती गायकवाड म्हणाल्या, याआधी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसोबत बैठक झाली होती. आजही सरकारकडे पाठपुरावा केला. तरीही आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे आता पुन्हा आंदोलन करणार आहेत. मानधनातील दीड हजार आणि मदतनीसांना हजार रुपयांची वाढ ही तुटपुंजी वाढ आहे. पेन्शन योजनेबाबत आमची भूमिका जाहीर केली जाईल. या योजनेत आमचा काही वाटा असावा, हे योग्य नाही, अशा शब्दांत गायकवाड यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा तसेच या खात्याच्या सचिव आय. ए. कुंदन, राज्याच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह कृती समितीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Back to top button