उठा देशवासीयांनो, जयजयकार करा! आग्रा करितो शिवरायांना मानाचा मुजरा | पुढारी

उठा देशवासीयांनो, जयजयकार करा! आग्रा करितो शिवरायांना मानाचा मुजरा

औरंगाबाद/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रविवारी (दि. 19) आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’मध्ये साजरी करण्यासाठी अखेर पुरातत्त्व विभागाने मंजुरी दिली. त्यामुळे यावर्षीची शिवजयंती आग्रा किल्ल्यात प्रचंड जल्लोषात साजरी करण्यात येणार आहे. ही माहिती अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचा सांस्कृतिक विभाग आणि पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाला पत्र लिहून महाराष्ट्र शासन काही सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी करणार असल्याचे कळविले होते. त्यानुसार
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने महाराष्ट्र शासनाला आग्रा किल्ल्याच्या ‘दिवाण-ए-आम’ सभागृहात यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याची अनुमती दिली आहे.

आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे, असेही विनोद पाटील यांनी सांगितले.

शिवजयंतीविषयी विनोद पाटील म्हणाले की, जयंतीसाठी बराच संघर्ष करावा लागला. न्यायालयीन लढाई लढावी लागली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार देशभरातील तरुणांमध्ये जावेत, यासाठी जयंती साजरी करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रीय आदर्श व्यक्ति मत्त्व आहेत व त्यांच्या विचारांचा प्रसार हा देशभर व्हावा, याच भावनेने आम्ही शिवजयंती साजरी करण्याची परवानगी मागितली होती. महाराष्ट्र सरकार सहआयोजक असेल, तर परवानगी द्यायला हरकत नाही, अशी भूमिका दिल्ली उच्च न्यायालयाने मांडली होती. त्यावर दोन दिवसांपूर्वीच राज्य सरकारही सहआयोजक होण्यासाठी तयार झाले आहे. हे सर्व घडत असताना शिवजयंती आग्य्रामध्येच व्हावी, असा आग्रह सर्व शिवभक्तांचा होता. परवानगी देताना काही अटी घातल्या आहेत, आम्ही या सर्व अटींचे पालन करू, असेही पाटील यांनी सांगितले.

1 कोटी शिवभक्त लाईव्ह सहभागी होणार

आग्रा येथे होणार्‍या शिवजयंती महोत्सवासाठी प्रत्यक्ष, तसेच डिजिटल स्वरूपात सुमारे 1 कोटी शिवभक्त सहभागी होणार असल्याचे यावेळी पाटील यांनी सांगितले. राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांमधून विमान, रेल्वे तसेच वाहनांमधून सुमारे 4 हजार शिवभक्त आग्रा येथे प्रत्यक्ष शिवजयंती महोत्सवात सहभागी होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोदी, शहांना निमंत्रण

आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक शिवजयंती सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यासंदर्भात त्यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्क साधण्यात आला असून, या सोहळ्यासाठी उपस्थित राहावे, अशी विनंती त्यांना केली असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.

सायंकाळी शिवछत्रपतींचा भव्य चरित्रपट अन् फटाक्यांची आतषबाजी!

जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान तळपला, त्याच ठिकाणी 19 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता शिवजयंतीचा कार्यक्रम रंगणार आहे. आग्रा किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यासाठी पुरातत्त्व विभागाने प्रारंभी परवानगी नाकारली होती; मात्र बुधवारी परवानगी देण्यात आली असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले. अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान आणि आर. आर. पाटील फाऊंडेशन आयोजित करत असलेल्या या शिवजयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही उपस्थिती राहणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा वेध घेणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे; तसेच आकर्षक फटाक्यांची आतषबाजीही करण्यात येणार आहे.

Back to top button