Anil Deshmukh: अजमल कसाबच्या कोठडीत ठेवून माझ्यावर दबाव टाकला – अनिल देशमुख | पुढारी

Anil Deshmukh: अजमल कसाबच्या कोठडीत ठेवून माझ्यावर दबाव टाकला - अनिल देशमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपशी तडजोड न केल्याने मला तुरुंगात टाकण्यात आले. आर्थर रोड जेलमध्ये दहशतवादी अजमल कसाबला ज्या कोठडीत ठेवण्यात आले होते. त्याच सेलमध्ये मला जबरदस्तीने ठेवण्यात आले होते. येथे भाजपशी तडजोड करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता, असा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) म्हणाले की, भाजपशी करार केला असता तर मला तुरुंगात जावे लागले नसते. पण मी पक्ष सोडला असता, तर महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षापूर्वी पडले असते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. मी आयुष्यभर तुरुंगात राहण्यास तयार आहे, पण तडजोड करणार नाही.

ईडी, सीबीआयच्या भीतीने अनेक आमदारांनी पक्ष बदलला. माझ्यावरही सतत दबाव टाकला जात होता. माझ्यावर 100 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप होता, मात्र आरोपपत्रात केवळ 1 कोटी 71 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या प्रकऱणात माझी फसवणूक झाली. परंतु माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास होता, त्यामुळे मला न्याय मिळाला. माझा एवढा छळ करूनही त्यांना माझ्याविरुद्ध पुरेसे पुरावे मिळाले नाहीत आणि ते कसे मिळवणार, कारण त्यांचे आरोप खोटे होते, असेही देशमुख म्हणाले.

दरम्यान, अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ महिने तुरुंगात होते. देशमुख यांना नोव्हेंबर २०२१ मध्ये अटक केली होती. गेल्या वर्षी २८ डिसेंबररोजी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

हेही वाचा 

Back to top button