Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या घराबाहेर जामीन मंजुरीच्या बातमीनंतर राष्ट्रवादीचा जल्लोष | पुढारी

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या घराबाहेर जामीन मंजुरीच्या बातमीनंतर राष्ट्रवादीचा जल्लोष

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयात सीबीआय प्रकरणी आज जामीन मंजूर झाला. ही माहिती समजताच नागपूर येथील जीपीओ चौकातील बंगल्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार जल्लोष केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त आणि देशमुख यांना जामीन हा दुग्ध शर्करा योग असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. ढोलताशांच्या गजरात, बुंदीचे लाडू परस्परांना भरवत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

न्यायालयीन प्रक्रियेत देशमुख यांच्या घरी येण्यास काहीसा वेळ लागणार असला तरी ते लवकरच निर्दोष बाहेर येतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांच्या नेतृत्वात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, शहर उपाध्यक्ष व प्रवक्त्या नूतन रेवतकर, प्रणव म्हैसेकर, अध्यक्ष नागपूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आदी अनेक पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान यावेळी नूतनताई रेवतकर यांनी भाजपरुपी कंसाने अनिल देशमुख रुपी वासुदेवाला कारागृहात टाकले असे मत व्यक्त केले. आज त्यांना जामीन मिळाला उद्या ते निश्चितच निर्दोष सिद्ध होतील. फार काळ अन्याय कोणावरहो करता येत नाही हे सिद्ध होईलच असा विश्वास व्यक्त केला. देशमुख यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोठेकर यांनी सत्य परेशान हो सकता पराजित नही. शरद पवार यांच्या जन्मदिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना हे गिफ्ट मिळाले आहे, असे देखील त्यावेळी म्हणाल्या. देशमुख यांच्या जमीन मिळाल्याच्या बातमीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला तरी देशमुखांची सुटका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्याने काहीशी निराशा देखील जाणवली आहे.

हेही वाचा

Back to top button