शिक्षक, पदवीधरमध्ये ‘मविआ’ची बाजी | पुढारी

शिक्षक, पदवीधरमध्ये ‘मविआ’ची बाजी

मुंबई / नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाचही जागांचे चित्र स्पष्ट झाले आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. औरंगाबाद आणि अमरावती या दोन मतदारसंघांत मविआने आघाडी घेतली आहे. मात्र, तिसर्‍या पसंतीच्या मतांसाठी उमेदवारांमध्ये चुरस दिसत आहे. भाजप समर्थित शिंदे गटाचा कोकणातील उमेदवार विजयी झाला आहे. मात्र भाजपने प्रतिष्ठेचा बनविलेला नागपूर शिक्षक मतदारसंघ गमावला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

कोकण शिक्षक मतदारसंघात भाजप-शिंदे गटाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी महाविकास आघाडीला दणका देऊन शानदार विजय मिळवला आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार सुधाकर अडबाले विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या नागो गाणार यांचा सात हजार मतांनी पराभव केला. नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी आघाडी घेतली आहे. औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विक्रम काळे हेही विजयी चौकार मारण्याच्या बेतात आहेत. तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघात मविआने पाठिंबा दिलेले धीरज लिंगाडे यांनी आघाडी घेतली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला. म्हात्रे यांना पहिल्या फेरीत तब्बल 20 हजार 648 मते मिळाली. तर पाटील यांना 9768 मते मिळाली आहेत. एकूण 3002 मते अवैध ठरली आहेत. म्हात्रे यांनी विजयी मताचा 16 हजार मतांचा कोटा पूर्ण केल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

नागपुरातील लढत एकतर्फीच

नागपुरातील पराभवाचे विश्लेषण करू, अशी प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. तर भाजपला बालेकिल्ल्यात तडाखा बसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

गाणार हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून निवडणुकीच्या रिंगणात होते. अडबाले यांना 16,700 मते मिळाली. गाणार यांना 8,211 मतांवर समाधान मानावे लागले. पहिल्या फेरीत अडबाले यांना 14,071 मते आणि गाणार 6,309 मिळाली. अडबाले यांनी पहिल्या फेरीत मतांचा कोटा पूर्ण करून विजय संपादला. या विजयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. कारण ही जागा भाजपने प्रतिष्ठेची केली होती.

नाशिकमध्ये सत्यजित तांबे आघाडीवर

काँग्रेसमधील अंतर्गत कलहामुळे सार्‍या राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांना 15 हजार 784 मते मिळाली. तर मविआ समर्थित उमेदवार शुभांगी पाटील यांना 7 हजार 862 मते मिळाली. पहिल्या फेरीत सत्यजित तांबे यांना 7 हजार 922 मतांची आघाडी मिळाली आहे. दरम्यान, सत्यजित हे विजयी ठरले तरीदेखील भाजपमध्ये जाणार नाहीत, अशी प्रतिक्रिया राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे.

विक्रम काळे आघाडीवर

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि मविआचे उमेदवार विक्रम काळे यांनी आघाडी संपादली आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीवेळी काळे यांना 20 हजार 78 मते पडली आहे. भाजपचे उमेदवार किरण काळे यांना 13 हजार 489 मते मिळाली. शिक्षक संघटनेचे उमेदवार सूर्यकांत विश्वासराव यांना 13 हजार 543 मते पडली आहे. एकूण 2 हजार 485 मते बाद झाली.

अमरावतीत तीव्र चुरस

अमरावती पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेले उमेदवार धीरज लिंगाडे यांनी आघाडी घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे डॉ. रणजित पाटील यांनी लिंगाडे यांना आव्हान दिले आहे. लिंगाडे बुलढाण्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख होते. अमरावती पदवीधर मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटल्यामुळे काँग्रेसने लिंगाडे यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी बहाल केली होती.

Back to top button