मुंबईत रंगकर्मींचे ‘प्रतिकात्मक पितृस्मृती आंदोलन’ | पुढारी

मुंबईत रंगकर्मींचे ‘प्रतिकात्मक पितृस्मृती आंदोलन’

मुंबई; पुढारी ऑनलाईन : ‘रंगकर्मी आंदोलन महाराष्ट्र’ यांच्या वतीने आज दादर शिवाजी पार्क येथे ‘पितृस्मृती आंदोलन’ करण्यात आले.

नाट्यगृह, चित्रपटगृह सुरू करण्याची परवानगी शासनाने दिल्यानंतर सुद्धा आंदोलनाचा महत्त्वपूर्ण भाग व पाठिंबा मिळालेल्या राज्यभरातील लोककलावंतांचे सांस्कृतिक क्षेत्र संपूर्णपणे कार्यरत झाले पाहिजे या मागणीसाठी प्रतिकात्मक पितृस्मृती आंदोलन करण्यात आल्याचे आंदोलनाचे प्रमुख अभिनेता विजय पाटकर यांनी सांगितले.

दिग्गज कलाकार व कलाप्रेमी राजकीय पूर्वजांचे स्मरण करुन ‘प्रतिकात्मक श्राद्ध’ यावेळी करण्यात आले. कलेचा जागर पुन्हा घुमायला हवा. यासाठी कलावंतानी आपल्या सादरीकरणातून ‘जोगवा’ देखील यावेळी मागितला.

सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबत तमाशा, भजन, किर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड आदी लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकारांचाही विचार प्रामुख्याने व्हायला हवा यासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात अनेक लोककलावंत सहभागी झाले होते.

सांस्कृतिक क्षेत्र नव्या जोमाने बहरून मायबाप रसिक व कलावंत यांची मैफील रंगावी, असा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद घेत त्याला शासनाच्या सकारात्मक प्रतिसादाचा कौल मिळेल असा विश्वास रंगकर्मीनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button