Kirit Somaiya यांचे 'या' ९ जणांवर आरोप; खरंच त्यांच्याकडे पुरावे आहेत का? - पुढारी

Kirit Somaiya यांचे 'या' ९ जणांवर आरोप; खरंच त्यांच्याकडे पुरावे आहेत का?

पुढारी ऑनलाईन डेस्क : विरोधी पक्ष म्हणजे काय असतो हे दाखवत भाजपने राज्यात तीन पक्षांचे सरकार असलेल्या महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे बॅकफूटवरू ढकलून देण्याचा प्रयत्न केला. सरकार स्थापन झाल्यापासून भाजपकडून कधी कथित, तर कधी गंभीर आरोपांची मालिकाच महाविकास आघाडीमधील नेत्यांवर सुरुच आहेत. यामध्ये सर्वप्रथम आघाडीवर आहेत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya). किरीट सोमय्या यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते अजित पवार ते कोल्हापूरचे मातब्बर नेते हसन मुश्रीफ यांच्यावर कथित गैरव्यवहारांच्या आरोपांची मालिकाच सुरुच आहे. त्यामुळे सरकारला दररोज बचाव करण्याची वेळा आली आहे.

किरीट सोमय्यांचे आतापर्यंत ९ जणांवर आरोप

किरीट सोमय्यांनी ((Kirit Somaiya) केलेल्या आरोपानंतर घायाळ झालेल्या हसन मुश्रीफ आणि अनिल परब यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत ९ जणांवर कथितरित्या आरोप केले आहेत. त्यामुळे त्या आरोपांचे काय झाले? की नुसत्याच हेडलाईन होऊन गेल्या हे आपण पाहणार आहोत.

किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, नारायण राणे, प्रताप सरनाईक, अनिल परब, भावना गवळी, मिलिंद नार्वेकर आणि हसन मुश्रीफ यांच्यावर आरोपांची मालिकाच केली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी आरोपानंतर स्वत:च मुरुडच्या समुद्रकिनारी बांधलेल्या बंगल्यावर जेसीबी घालून जमीनदोस्त केला. किरीट सोमय्या यांनी आरोप करून ईडीकडेच डायरेक्ट कागदपत्रे देत असल्याने राज्यातही त्याची चांगलीच चर्चा होत आहे.

हसन मुश्रीफांवर कारखान्यात कारखान्यात घोटाळा केल्याचा आरोप

किरीट सोमय्या यांनी मागील आठवड्यात हसन मुश्रीफ यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप करत आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यात मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी १२७ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी कारखान्यावरूनही सोमय्या यांनी आरोप केले. अर्थातच हे सर्व आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावत याचा मास्टरमाईंड चंद्रकात पाटील असल्याचा केला. तसेच समरजित घाटगे यांनाही अप्रत्यक्ष इशारा दिला. त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावत अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

अजित पवार

सिंचन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता. सिंचन घोटाळा ७० हजार कोटींचा असल्याचा आरोप भाजप आणि किरीट सोमय्यांकडून करण्यात आला. या घोटाळ्यातून अजित पवार जेलमध्ये जाणार असल्याचेही सोमय्या यांनी म्हटले होते. मात्र, २०१९ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना क्लिन चिट देण्यात आली.

मिलिंद नार्वेकर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी अलीकडेच मुरुड येथील बंगला जमीनदोस्त केला. या बंगल्यावरून किरीट सोमय्या यांनीच आरोप केले होते. बंगला जमिनदोस्त झाल्यानंतर करून दाखवले अशी प्रतिक्रिया, त्यांनी ट्विट करून दिली होती.

प्रताप सरनाईक

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर चांगलेच घायाळ झाले आहेत. त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला देत अप्रत्यक्षरित्या किरीट सोमय्या यांच्या आरोपांची धास्ती घेतली आहे का? अशी चर्चा रंगली.

सोमय्या यांनी प्रताप सरनाईकांवर विहंग हाऊसिंग योजनेतून २५० कोटींचा अपहार केल्याचा आरोप केला. प्रताप सरनाईक आणि त्यांचे चिरंजिव सध्या ईडीच्या रडारवर आहेत. प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्यांवर १०० कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

नारायण राणे यांच्यावर बेहिशेबी मालमत्तेचा आरोप

नारायण राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या कुटुंबियांवर बेहिशेबी मालमत्तेवरून चौकशी करण्याची मागणी २०१६ मध्ये किरीट सोमय्या यांनी केली होती. त्यांनी ही मागणी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

राणे यांनी कंपन्यांची स्थापना केली, त्यामध्ये अल्प किंमतीमध्ये समभाग दाखवून ते नंतर अधिक किंमतीने विकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या प्रकरणात पुणे पोलिसांकडून नारायण राणे यांच्या पत्नी नीलम, पुत्र नितेश यांच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे.

अनिल परब

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी अनधिकृत बांधकामे केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अनिल परब यांच्यावर मंत्री झाल्यापासूनच आरोप केले आहेत.

वांद्रे येथील गांधी नगर परिसरात अनधिकृत बांधकाम केल्याची तक्रार सोमय्या यांनी केली आहे. अनधिकृत बांधकाम पाडण्याची मागणी त्यांनी केली आहे. सोमय्या यांनी केलेल्या आरोपांनी माझी बदनामी झाली असून त्यांनी केलेले आरोत तथ्यहिन असल्याचे सांगत अनिल परब यांनी १०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.

शिवसेना खासदार भावना गवळी

भावना गवळी सुद्धा सोमय्यांच्या आरोपांनंतर ईडीच्या रडारवर आल्या आहेत. अलीकडेच त्यांच्या वाशिम येथील विविध संस्थांवर ईडीने छापेमारी केली आहे. अर्थातच भावना गवळई यांनी सोमय्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. भावना गवळी यांनी १०० कोटींचा अपहार केल्याचा आरोप आहे. त्यांनी ईडी, सीबीआय, राज्य आणि केंद्राकडे मागणी केली होती.

छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन घोटाळा, सदनिका घोटाळा, आर्मस्टाँग घोटाळा अशी विविध घोटाळ्यांमध्ये गंभीर आरोप झाले. महाराष्ट्र सदन प्रकरणात त्यांना दोन वर्ष तुरुंगात काढावी लागली. दरम्यान, याच महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. बनावट कंपन्यांच्या नावे संपत्ती खरेदी करून १२० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

अशोक चव्हाण

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श घोटाळ्यात मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणात सोमय्या यांनीच आरोप केले होते.

हे ही वाचा :

Back to top button