शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘गुजरात पॅटर्न’ | पुढारी

शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘गुजरात पॅटर्न’

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थी मागे राहू नयेत, या काळजीने आता सरकार ढ शाळा व विद्यार्थ्यांवर थेट ‘वॉच’ ठेवणार आहे. एखादा विद्यार्थी अभ्यासात कच्चा आढळल्यास तत्काळ त्या विद्यार्थ्याचा अभ्यास सुधारण्याच्या सूचना शाळा आणि विद्यार्थ्यांना देण्यात येतील.

गुजरातमध्ये अशाप्रकारचा प्रयोग यशस्वी झाला आहे. तेथील विद्या समीक्षा केंद्राने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा अभ्यास सुधारण्यासाठी काही शिक्षणतज्ज्ञांची मदत घेतली होती. या तज्ज्ञांनी अभ्यासक्रम सुधारणेसह थेट अभ्यासात कच्च्या असलेल्या विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घेतला. सराव परीक्षेत त्याच्या अभ्यासात प्रगती झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे गुजरात सरकारने हाच फॉर्म्युला राबवून शाळा आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली आहे.

विद्या समीक्षा केंद्राप्रमाणे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पुण्यात महाराष्ट्र शिक्षण समृद्धी केंद्र स्थापन केले आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केरळचा नुकताच दौरा केला होता. तेथील शिक्षण पद्धतीवर प्रभावित होऊन तिसरीपासून दरमहा सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या परीक्षेत एखादा विद्यार्थी नापास झाला, तर त्याला पुन्हा अभ्यासाचे स्वतंत्र धडे देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांवर आणि संबंधित शाळांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने शिक्षण समृद्धी केंद्र स्थापन केले आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक कैलास पगारे यांनी दिली.

दरमहा होणार्‍या परीक्षेचे या केंद्रात परीक्षण केले जाणार आहे. मागील परीक्षेत मिळालेल्या गुणांची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाईल. एखाद्या विद्यार्थ्याला पुन्हा कमी गुण मिळाले, तर या केंद्रातील तज्ज्ञ थेट त्या विद्यार्थ्याशी संपर्क करून त्याला अभ्यास सुधारणेच्या सूचना केल्या जातील. या केंद्रातून प्रश्नसंचसुद्धा तयार केले जाणार आहेत.

Back to top button