मुंबई : बोम्मईंविरोधात राज्यात संतापाची लाट | पुढारी

मुंबई : बोम्मईंविरोधात राज्यात संतापाची लाट

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितला होता. त्यानंतर त्यांनी बुधवारी पुन्हा एक ट्विट करीत सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा केला. त्यावर महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

बेळगाव, निपाणी, कारवार द्या; मग तुमच्या मागण्यांचे बघू : शरद पवार

बेळगाव, कारवार, निपाणीसह सीमाभाग अगोदर महाराष्ट्रात विलीन करा; मग त्यानंतरच जत तालुक्यातील गावे कर्नाटकला द्यायची की काय करायचे ते ठरवू, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी व्यक्त केले.
केवळ एकतर्फी मागणी करू नका. महाराष्ट्र वर्षानुवर्षे जी मागणी करीत आहे, त्यावर प्रथम कृती करा. त्यानंतर तुम्हाला काय द्यायचे, तुमची मागणी योग्य आहे की अयोग्य, यावर विचार करता येईल.

राज्यपालांवर टीका

वादग्रस्त विधान करण्याची सवय असलेल्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याविरोधात बोलून आता मर्यादा ओलांडल्या आहेत. केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे, असेही मत त्यांनी व्यक्त केले. राज्यात शेतकरी अस्वस्थ झाला आहे. इतक्या संकटात पहिल्यांदाच सापडला असताना त्याच्या पाठीशी उभे राहण्याची राज्य सरकारची जबाबदारी आहे; पण गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे- फडणवीस सरकार आपल्या राज्यात सुट्ट्या देत आहे, याविषयी पवार यांनी चिंता व्यक्त केली.

बोम्मईंना महाराष्ट्र लेचापेचा वाटला काय? : अजित पवार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर आता अक्कलकोटवरही दावा करणार्‍या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र लेचापेचा वाटला काय, असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी केला. कर्नाटकने आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीसाठी ते राष्ट्रवादी भवनमध्ये आले असता, माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावताना पवार म्हणाले, त्यांनी अशी वक्तव्ये करणे ताबडतोब थांबवावे. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय आहे. लोकांचे महागाई आणि बेरोजगारीवरून लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात आहेत. सध्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे, हे आपल्याला माहीत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दांत त्यांना सुनावले पाहिजे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. केंद्रानेही यामध्ये तत्काळ हस्तक्षेप करावा. कारण, महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही, असा इशाराही पवार यांनी दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ज्योतिषाकडे गेले असल्याची चर्चा आहे. त्यावर पवार म्हणाले, आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूरला गेलो, तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल, तर याद राखा :  खा संजय राऊत

मुंबई : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मी शिवसेनेकडून इशारा नाही; तर धमकी देत आहे. महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा. ‘हे घेऊ, ते घेऊ’ ही तुमची बकबक बंद करा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते, खा. संजय राऊत यांनी सीमा प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आधी जत तालुक्यातील 40 गावे आणि त्यानंतर सीमाभागातील गावांबद्दल केलेल्या विधानांवरून राज्यात राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला. महाराष्ट्राचे सरकार कमजोर, मिंधे, दुर्बल असेल; पण आजही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाराष्ट्रावरील प्रत्येक संकट परतवून लावेल. आम्हाला तुरुंगाची भीती नाही. शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, ज्याने 69 हुतात्मे दिले आहेत. बाळासाहेबांनी तुरुंगवास भोगलाय, आम्हीही भोगू. महाराष्ट्रातील सरकार जरी गुडघ्यावर बसले असले, तरी शिवसेना स्वाभिमानाने उभी आहे हे विसरू नका, असा इशारा राऊत यांनी दिला.

Back to top button