मलिक-देशमुख अजून प्रतीक्षेतच! | पुढारी

मलिक-देशमुख अजून प्रतीक्षेतच!

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खा. संजय राऊत यांची बुधवारी जामिनावर सुटका झाली. तब्बल 102 दिवसांनी ते तुरुंगाबाहेर आले. राऊतांची सुटका झाली असली, तरी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या सुटकेची प्रतीक्षा कायम आहे. त्यासोबतच विविध यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी बाकांवरील नेत्यांमागचा चौकशीचा ससेमिरा कायम आहे.

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पातील गैरव्यवहारप्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले होते. 31 जुलै रोजी त्यांना अटक झाली. तीन महिन्यांनंतर राऊत जामिनावर बाहेर आले. तर 100 कोटी रुपयांच्या कथित खंडणी वसुलीप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख अद्याप तुरुंगातच आहेत. 3 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांना अटक करण्यात आली होती. एक वर्षाहून अधिक काळ ते तुरुंगातच आहेत. तसेच कुविख्यात दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी माजी मंत्री नवाब मलिक हे 24 फेब्रुवारी 2022 पासून तुरुंगात आहेत.

संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली असली, तरी ‘मविआ’च्या अन्य नेत्यांवर कारवाईची टांगती तलवार
कायम आहे. दोनच दिवसांपूर्वी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर दापोलीतील अनधिकृत रिसॉर्टप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच माजी महापौर व शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर या चौकशीच्या फेर्‍यात अडकल्या आहेत. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीचे काही नेतेही चौकशीच्या ‘रडार’वर आहेत.

Back to top button