एसटीच्या सहा हजार बसेस जाणार भंगारात | पुढारी

एसटीच्या सहा हजार बसेस जाणार भंगारात

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आर्थिक तोट्यातील एस.टी. महामंडळाने 2016 ते 2019 मध्ये नवीन बसेस न घेता केवळ वापरातील बसेसच्या नूतनीकरणावर भर दिला आहे. त्यामुळे एस.टी.च्या ताफ्यात एकही नवीन बस दाखल झाली नाही.त्यातच येत्या सहा महिन्यांत सुमारे सहा हजार 289 एस.टी. बसेस भंगारात जाणार आहेत. त्यामुळे एस.टी.अभावी ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

दरवर्षी तीन हजार बसेस बाद करून त्याबदल्यात दीड हजार नव्या बसेस खरेदी करायच्या, तर दीड हजार बसेसचे नूतनीकरण करायचे, असे 2016 मध्ये एस.टी.च्या बसेसच्या पुनर्विकासाचे धोरण होते. परंतु, 2016 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी या धोरणात बदल करून तीन हजार वापरातील बसेसचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दीड हजार नवीन बसेस महामंडळाच्या ताफ्यात आल्याच नाहीत. ताफ्यातील बसेसचे आयुर्मान पूर्ण झाल्याने भंगारात जाणार्‍या बसेसची संख्या वाढली. त्यामुळे महामंडळाकडे बसेसचा तुटवडा निर्माण झाला.

एस.टी.च्या ताफ्यात सप्टेंबर महिन्यात एकूण 15 हजार 300 बसेस होत्या. त्यात बारा वर्षांचे आयुर्मान पूर्ण झालेल्या सुमारे सहा हजार 289 बसेस आहेत. जुन्या बसमध्ये बिघाडाचे प्रमाण वाढते, दुरुस्तीनंतरही या बस मार्गात बंद पडतात. प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.

Back to top button