मुंबई : लटकेंची उमेदवारी धोक्यात; हायकोर्टात आज सुनावणी | पुढारी

मुंबई : लटकेंची उमेदवारी धोक्यात; हायकोर्टात आज सुनावणी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने ऋतुजा लटके यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असले तरी मुंबई महापालिकेच्या नोकरीचा त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर करण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करत आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही लटके यांना दिलासा न दिल्यास लटके यांच्यासोबतच एक डमी उमेदवार उतरवण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. हा पर्यायी उमेदवार कोण हे मात्र गुलदस्त्यात आहे.

दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी  देण्याचा निर्णय या अगोदरच उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्यानुसार लटके यांनी गेल्या 2 सप्टेंबरला पालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र त्यात त्यांनी अटी घातल्या होत्या. आपल्याला उमेदवारी मिळाली तर राजीनामा मंजूर करावा. जर मिळाली नाही तर राजीनामा मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती त्यात करण्यात आली होती. त्यावर पालिकेने महिनाभराने उत्तर देत असा राजीनामा मंजूर करता येत नसल्याचे कळवले. परिणामी, लटके यांनी 3 ऑक्टोबरला सुधारित राजीनामा दिला आणि तो तात्काळ मंजूर व्हावा म्हणून नियमानुसार 1 महिन्याचा पगारही कोषागारात जमा केला. तरीही हा राजीनामा मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. तो मंजूर झाल्याशिवाय लटके यांना निवडणूक लढवता येणार नाही.

शिवसेनेसमोर निर्माण झालेला हा मोठा पेच होय. राजीनामा मंजूर व्हावा म्हणून बुधवारी स्वत… ऋतुजा लटके यांनी
महाडेश्वर व शिवसेनेच्या अन्य नेत्यांसोबत पालिका आयुक्तांची भेट घेतली. पण आयुक्त सकारात्मक दिसले नाहीत. विशेष बाब म्हणून राजीनामा मंजूर करण्याचा अधिकार आयुक्तांना आहे. पण जाणून बुजून चालढकलपणा केला जात आहे. त्यामुळे आयुक्तानावर नक्कीच कुणाचा तरी दबाव असणार हे स्पष्ट होते, असा आरोप मुंबईचे माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला.

शिवसेना कोर्टात !

ऋतुजा लटके यांचा पालिकेतील नोकरीचा राजीनामा प्रशासनाने स्वीकारला नाही. त्यामुळे शिवसेनेने कोर्टात धाव घेतली आहे. तातडीने राजीनामा मंजूर करण्यासाठी पालिका कर्मचारी सेवा नियमानुसार एक महिन्याचा पगारही पालिकेच्या कोषागारमध्ये जमा करण्यात आला आहे. याचाच आधार घेऊन, कोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून गुरुवारी यावर सुनावणी होणार आहे.

ऋतुजा रमेश लटके यांनी आपला राजीनामा दिला आहे. मात्र राजीनामा मंजूर करण्यासाठी पालिका कर्मचारी सेवा नियमामध्ये काही प्रक्रिया असतात. यासाठी किमान 30 दिवसांचा वेळ लागणार आहे. त्यानंतरच राजीमामा मंजूर करण्यात येईल, असे स्पष्टीकरण खुद्द पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी बुधवारी दिले. आता उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्यास लटके यांची उमेदवारी धोक्यात येईल किंवा त्यांनी भरलेला अर्ज निवडणूक आयोगाकडून छाननीमध्ये फेटाळला जाईल.

दुसरीकडे महापालिका प्रशासनाने लटकेंचा राजीनामा मंजूर केला नाही तरी त्यांचा उमेदवारी अर्ज ठाकरे गटाकडून भरण्यात येणार असून, त्यासोबत डमी उमेदवारी अर्जही भरण्यात येणार आहेत. 17 ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी होईपर्यंत, पालिकेने राजीनामाचा कोणताही निर्णय घेतला नाही तर, डमी उमेदवार शिवसेनेचा अधिकृत उमेदवार राहील, असे सांगण्यात येत आहे.

शिंदे गटाच्या हालचाली

ऋतुजा लटके यांना शिंदे गटात घेण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून काही प्राथमिक चर्चाही झाल्याचे समजते. ही निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आणि मी शिंदे मिळून उमेदवार ठरवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यातून पोट निवडणुकीत शिंदे
गटासाठी भाजपही आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवणार नसल्याचे संकेत मिळतात. मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना फोडण्यात यशस्वी झाले तर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी रंगतदार ठरू शकते.

लटकेंना मंत्रिपदाचे आमिष : अनिल परब

लटके यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाकडून उमेदवारी दाखल करू नये यासाठी शिंदे गटाने त्यांना मंत्रिपदाचे आमिष दाखविले असल्याचा आरोप सेना नेते अनिल परब आणि खा. अरविंद सावंत यांनी बुधवारी
पत्रकार परिषदेत केला. सरकारकडून आलेल्या दबावामुळेच महापालिका राजीनामा मंजूर करीत नसल्याचेही
त्यांनी सांगितले. शिवसेना लटके यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.

मशाल चिन्हावरच लढणार : ऋतुजा लटके

लटके यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेेतली असल्याचे बोलले जात होते. त्याचा लटके यांनी इन्कार केला. आपण शिंदे यांची भेट घेतलेली नाही. मी उद्धव ठाकरे गटाकडूनच विधानसभेची पोटनिवडणूक
लढविणार आहे. माझे चिन्ह मशालच असेल असे त्यांनी स्पष्ट केले.

अनिल परब यांचा डाव?

सेना नेते अ‍ॅड. अनिल परब यांच्या मनातील उमेदवार वेगळाच असून, त्यांनीच ऋतुजा लटके यांना लटकवले.
एक महिना हे राजीनामा प्रकरण सुरू असताना परब होते कुठे, की हे राजीनामा प्रकरण त्यांनी मुद्दाम गुंतागुंतीचे बनवले, असा सवाल भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता भालचंद्र शिरसाट यांनी केला.

Back to top button