महाराष्ट्रातील 17% मुलांना मराठीचे तोंडी आकलन नाही; केंद्राचा धक्कादायक निष्कर्ष | पुढारी

महाराष्ट्रातील 17% मुलांना मराठीचे तोंडी आकलन नाही; केंद्राचा धक्कादायक निष्कर्ष

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील सुमारे 45 टक्के विद्यार्थ्यांना तीन आकडी बेरीज येत नाही. तर सुमारे 17 टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही मराठीच्या तोंडी भाषेचे आकलन होत नसल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या पायाभूत अध्ययन अभ्यास अहवालातून उघड झाले आहे. देशाच्या तुलनेत मराठी भाषा आकलनात महाराष्ट्राची कामगिरी 83 तर देशाची 82 टक्के आहे. इंग्रजी भाषेत हे प्रमाण राज्य 88, देशात 86 टक्के तर हिंदी भाषेत राज्य 88 तर देश 85 टक्के असे आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020मध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर भर देण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारतर्फे निपुण भारत हे अभियान राबविण्यात येत आहे. याअंतर्गत 2026-27पर्यंत इयत्ता तिसरीच्या प्रत्येक विद्यार्थ्याने पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने मार्च महिन्यात पायाभूत अध्ययन अभ्यास नमुना सर्वेक्षण घेतले होते.

विद्यार्थ्यांचे शब्द वाचन, ऐकून शब्द लिहिण्याची क्षमता, चित्र ओळखणे त्याचबरोबर भाषेतील कृती तयार करून अंक ओळखणे आदी चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यावरून विद्यार्थ्यांची आकलन क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती निश्चित करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या क्षमता आणि संपादणूकीचा अहवाल केंद्र सरकारकडून नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. यातून ही टक्केवारी समोर आली आहे. राज्यात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये प्रामुख्याने मराठी माध्यमांच्या शाळा सोबतच गुजराती, कन्नड, हिंदी, बंगाली आणि उर्दू शाळांचा समावेश होता, त्यामध्ये 113 मराठी शाळा त्यातील 211 शिक्षक आणि 994 विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण करण्यात आले होते. तसेच राज्यभरातील 576 शाळातील 5 हजार 308 विद्यार्थी व 1091 शिक्षक आणि 578 मुख्याध्यापक निवडण्यात आले होते. राज्यातील 7 भाषा माध्यमातूनही हे सर्वेक्षण करण्यात आले.

या सर्वेक्षणात देशातील इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थी पुढे असल्याचे स्पष्ट झाले असले तरी मराठी विषयात अजून 17 टक्के मागे असल्याचे दिसत आहे. राज्यातील 22 टक्के विद्यार्थ्यांना अद्यापही पेपर व पेन्सिलच्या सहाय्याने बेरीज- वजाबाकी येत नाही तर 83 टक्के विद्यार्थ्यांना हाताच्या सहाय्याने आकडेमोड करता येत नाही. केवळ 54 टक्के विद्यार्थ्यांना घड्याळात किती वाजले आहेत हे कळते. तर 39 टक्के विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते. फक्त 41 टक्के विद्यार्थ्याना अपूर्णांकाबद्दलची माहिती आहे. 43 टक्के विद्यार्थी ते योग्य पद्धतीने दाखवू शकतात.

भाषा समजणे, वाचन, चित्रांवरून वाक्य तयार करणे, अक्षर ओळख यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. मराठीसह इंग्रजी आणि हिंदी भाषा आकलनात देशाच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली असली तरी मराठी भाषा आकलनात महाराष्ट्राची कामगिरी 83 तर देशाची 82 टक्के आहे. इंग्रजी भाषेत हे प्रमाण राज्य 88, देश 86 टक्के तर हिंदी भाषेत राज्य 88 तर देश 85 टक्के असे आहे. प्रामुख्याने विद्यार्थ्यांची इंग्रजी, मराठी आणि इतर विषयातील वाचन क्षमता किंचित सुधारली असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तर अक्षर ज्ञानामध्ये राज्यातील विद्यार्थी देशाच्या तुलनेत अधिक विकसित असल्याचेही टक्केवारीत दिसून येत असल्याने समाधान आहे.

  • 12 पैकी 10 विद्यार्थ्यांना मराठीचे शब्दोच्चार योग्य प्रकारे येतात.
  • 12 टक्के विद्यार्थ्यांना प्राथमिक इंग्रजी अक्षरे वाचता येत नाही.
  • 8 टक्के विद्यार्थी बुद्धीमत्तेच्या आधारे गणित सोडवितात.
  • 19 टक्के विद्यार्थी हाताच्या बोटांवर गणित करतात.
  • 39 टक्के विद्यार्थ्यांना तारीख, वार, महिना ओळखता येत नाही.
  • 73 टक्के विद्यार्थी कागद पेन्सिलचा वापर करूनच गणित सोडवू शकतात.
  • 71 टक्के विद्यार्थ्यांना गुणाकार कसा करायचे इतके समजते.
  • 12 टक्के विद्यार्थ्यांना एक आकडी वजाबाकी येते.

Back to top button