इस्लामपूर; संदीप माने : शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी केंद्रातील नेतृत्वाला आव्हान देणारे राजू शेट्टी आता पुरग्रस्तांच्या प्रश्नासाठी 'महाविकास आघाडी' विरोधात रान उठवत आहेत. त्यातच महाविकास आघाडीकडून दिलेल्या विधान परिषदेसाठीच्या १२ आमदारांच्या यादीतून राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा 'करेक्ट कार्यक्रम' कोणी केला? याची जोरदार चर्चा होवू लागली आहे.
एकेकाळी राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या जोडगिळीने साखर सम्राटांना हादरून सोडले होते. दोघांनी उसापासून निघणारी साखर, मळी, इथेनॉल, दारू, बग्यास आदी उपपदार्थ आणि वीजनिर्मिती प्रकल्पातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिशोब शेतकऱ्यांसमोर मांडला. त्यामुळे शेतकऱ्यांना उसाचे गणित समजू लागले. काटा मारीवर लगाम बसला.
दूध, ऊस दर या जिव्हाळ्याच्या प्रश्नासाठी आंदोलने झाली; आणि त्या आंदोलनाला ऊस पट्ट्यात बळ मिळत गेले. यामुळे इतर शेतकरी संघटना मागे पडत गेल्या. २००९, २०१४ निवडणुकीवेळी हातकणंगले मतदारसंघात शेट्टींचा वारू चौफेर उधळत होता.
शेट्टींची आघाडीशी जवळीक…
सदाभाऊ खोत यांना भाजप सरकारमध्ये राज्यमंत्रीपद मिळाले. त्यानंतर काही महिन्यांतच शेट्टी आणि खोत यांच्यात वितुष्ट आले. शेट्टींनी आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांशी जवळीक करायला सुरुवात केली. ऊस, दूध दराच्या आंदोलनाला काहीशी मरगळ आली. आघाडीशी जवळीक वाढल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीने शेट्टींना उमेदवारी दिली. जातीचे राजकारण, साखर सम्राटांविरोधात केलेली आंदोलने, दुखावलेले कार्यकर्ते, स्वकीयांनी दिलेला दगा आदी कारणांनी शेट्टी यांना पराभव झाल्याची चर्चा होती.
महाविकासआघाडीत शेट्टी यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा होती. आघाडीच्या यादीतही शेट्टी यांचे नाव होते. मात्र, शेट्टी यांनी पूरग्रस्तांच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह वाळवा, शिराळा तालुक्यात आक्रोश मोर्चे काढून सरकारला आव्हान दिले आहे. या मोर्चांना भाजपकडून बळ मिळत आहे.
काही महिन्यांपूर्वी दिल्लीत देशातील शेतकरी संघटना भाजपच्या विरोधात एकत्र आल्या होत्या. शेट्टी यांनी त्या आंदोलनात पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्या विरोधात निदर्शने केली होती. त्यामुळे शेट्टींसाठी भाजपची रणनिती, भूमिका काय असणार आहे? याकडे लक्ष आहे. आजमितीस शेट्टी यांना आमदारकीपासून दूर लोटून त्यांचा कार्यक्रम कोणी केला याची चर्चा ऊस पट्ट्यात आहे.
वाळवा- शिराळा तालुक्यात मंत्री जयंत पाटील यांना विरोधासाठी राष्ट्रवादी विरोधक एकत्र आल्याचे अनेक निवडणुकांत स्पष्ट झाले आहे. शेट्टींनी इस्लामपूरात आक्रोश मोर्चा निमित्ताने आणि इस्लामपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपशी जवळीक करून जयंत पाटल यांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. त्यामुळे आतापासूनच आगामी निवडणुकांची 'रंग' उधळण सुरू झाली आहे.