‘आपले गुरुजी’ मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यास विरोध | पुढारी

‘आपले गुरुजी’ मोहिमेअंतर्गत वर्गात शिक्षकांचा फोटो लावण्यास विरोध

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : ‘आपले गुरुजी’ या नावाने वर्गात संबंधित शिक्षकांचा फोटो लावण्याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, या उपक्रमाला आता शिक्षक संघटनांनी विरोध केला असून शिक्षक भारतीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिक्षण विभागाने वर्गात शिक्षकांचे फोटो लावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन आठवड्यांत याबाबत पूर्तता करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालक स्तरावर देण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांनी यासंदर्भातली कार्यवाही करावी आणि तो अहवाल कार्यालयात सादर करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शिक्षक भारतीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेनुसार शिक्षण आयुक्त, पुणे यांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील शिक्षणाधिकारी व शिक्षण निरीक्षक यांना विसीद्वारे ए फोर साईज पेपरवर शिक्षकांचे वर्गात फोटो लावण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच पावसाळी अधिवेशनादरम्यान शिक्षकांबद्दल अपमानजनक वक्तव्य केले आहे. या दोन्ही घटना समाजव्यवस्थेतील शिक्षकांच्या सन्मानाला धक्का देणार्‍या आहेत.

शासन पातळीवर जाणीवपूर्वक शिक्षकांना बदनाम करून अनुदानित शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. 29 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून काम करण्याचा व राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयांत निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.विद्यार्थ्यांच्या उत्तम शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षकांच्या कार्याला व अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी शासनस्तरावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झालेली आहे. शिक्षकांनी चांगल्या प्रकारचे काम केले किंवा नाही याबाबतचे मूल्यमापन वस्तुनिष्ठ स्वरूपात व्हावे व त्यासाठी पर्यवेक्षकीय यंत्रणांना अधिक सक्षम करावे. 99.99 टक्के शिक्षक प्रामाणिकपणे काम करीत आहेत. केवळ अपवादात्मक प्रकरणात कामचुकारपणा करणार्‍या शिक्षकांमुळे सर्वांना जबाबदार धरणे न्यायोचित होणार नाही. दोषींवरील कारवाईचे कोणीही समर्थन करणार नाही; पण त्यासाठी सर्व शिक्षकांना अपमानित करू नये, असे शिक्षक भारतीने म्हटले आहे.

Back to top button