अलिबागमधील जमीन खरेदीसाठी संजय राऊतांनी 3 कोटी रोखीने दिले | पुढारी

अलिबागमधील जमीन खरेदीसाठी संजय राऊतांनी 3 कोटी रोखीने दिले

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  पत्रा चाळ घोटाळ्याचे मास्टरमाईंड आणि सर्वात मोठे लाभार्थी असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्या. एम. जी. देशपांडेे यांनी गुरुवारी आणखी चार दिवसांची वाढ केली. परिणामी राऊत यांचा कोठडीतील मुक्‍काम सोमवारपर्यंत वाढला आहे. यापूर्वी दिलेली 4 दिवसांची कोठडी गुरुवारी संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. अलिबागमधील जमीन खरेदीसाठी राऊत यांनी तीन कोटी रुपये रोखीने दिल्याचा आरोप ईडीने न्यायालयासमोर केला.

एचडीआयएलएफकडून प्रवीण राऊत यांच्या खात्यात सुमारे 112 कोटी रुपये हस्तांतरित झाले. ही रक्‍कम प्रवीण राऊत यांनी त्यांचे जवळचे सहकारी, कुटुंबातील सदस्य, त्यांच्या व्यावसायिक संस्था इत्यादींच्या विविध खात्यांमध्ये वळती केली. त्यांची चौकशी करण्यासाठी एका व्यक्‍तीला आणि राऊत यांना समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याचे सांगत राऊत यांच्या कोठडीत 10 ऑगस्टपर्यंत वाढ करावी, अशी विनंती ईडीने केली; तर निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सर्व व्यवहार उघड झाल्यामुळे पुढील कोठडीत चौकशीची आवश्यकता नाही, असा दावा राऊत यांच्या वतीने अ‍ॅड. मनोज मोहिते यांनी केला.

पत्रा चाळ पुनर्विकास घोटाळ्यातून मिळालेला पैसा राऊत यांनी जमीन खरेदीसाठी वापरला, असे ईडीने आधीच म्हटले आहे. आधी ही रक्‍कम 1 कोटी 6 लाख रुपये असल्याचे ईडीने म्हटले होते. आता अलिबागच्या किहिम बीचवर जमिनीचे लहान-लहान दहा तुकडे खरेदी करण्यासाठी याच घोटाळ्यातील तीन कोटी रुपये राऊत यांनी रोख दिले. ही रक्‍कम पत्रा चाळ घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि वादग्रस्त गुरू आशिष कन्स्ट्रक्शनचा संचालक प्रवीण राऊत याने दिल्याचा आरोप ईडीने केला आहे.

ईडी कोठडीत श्‍वास घेण्यास त्रास
तुमची ईडीबद्दल काही तक्रार आहे का, असे न्या. देशपांडे यांनी विचारले असता
राऊ त म्हणाले, तक्रार विशेष नाही. पण ईडीने दिलेल्या खोलीला खिडकी नाही. त्यामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो. त्यावर ही खोली वातानुकूलित असल्याने खिडकी बंद ठेवावी लागते, असे ईडीने स्पष्ट केले. राऊत यांना खिडकी असलेली हवेशीर खोली देऊ , अशी हमीही ईडीने न्यायालयास दिली.

वर्षा राऊत यांना समन्स
दरम्यान, या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. शुक्रवारी 5 ऑगस्ट रोजी त्यांना ईडीसमोर हजर व्हावे लागेल.

ईडी-राऊत चकमक

ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर गाडीत बसत असताना संजय राऊत आणि ईडी अधिकार्‍यांमध्ये चकमक झडली. संजय राऊत यांना न्यायालयात नेताना त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत, जावई मल्हार नार्वेकर आणि काही शिवसैनिक त्यांना भेटायला आले होते. गाडीत बसण्यापूर्वी संजय राऊत या सगळ्यांशी बोलत होते, हात मिळवत होते. परंतु ईडी अधिकार्‍यांनी त्यांना रोखले. हे योग्य नाही, तुम्ही सध्या ईडी कोठडीत आहात आणि आपल्याला न्यायालयाकडे निघायचे आहे, असे अधिकार्‍यांनी त्यांना सांगितले. त्यावरून संजय राऊतही संतापले.

Back to top button