आ. राहुल कुल यांना मंत्रिपदाचे आमिष | पुढारी

आ. राहुल कुल यांना मंत्रिपदाचे आमिष

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा :  भाजपचे आमदार राहुल कुल यांना शिंदे मंत्रिमंडळात मंत्री बनवण्याचे आश्‍वासन देऊन त्यांच्याकडून 90 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या चौघांना हॉटेल ओबेरॉयमध्ये पोलिसांनी अटक केली. रियाज अल्लाबक्ष शेख, योगेश मधुकर कुलकर्णी, जाफर अहमद रशीद, अहमद उस्मानी आणि सागर विकास संगवई अशी या चौघांची नावे आहेत. याच गुन्ह्यात ते चौघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत. यातील रियाज हा पुलाची शिरोली (ता. हातकणंगले) येथील रहिवासी आहे.

रियाजने आमदार राहुल कुल यांना आपण दिल्लीतून आलो असून, एका मोठ्या राजकीय नेत्याशी त्यांचे संबंध असल्याचा दावा केला होता. राहुल कुल यांच्याकडेच ओंकार बाळकृष्ण थोरात हे सचिव म्हणून काम पाहतात. 16 जुलैला राहुल कुल हे आकाशवाणी आमदार निवासमध्ये होते.

यावेळी ओंकार थोरात यांना रियाजचा फोन आला. आपण दिल्लीतून मुंबईत आलो असून, साहेबांना भेटायचे आहे. त्यांच्यासाठी एक चांगली ऑफर असून, दिल्लीतील अनेक भाजप नेत्यांशी आपले चांगले संंबंध आहेत, असे त्याने सांगितले. त्यानंतर ओंकारने त्यांना साहेबांना बोलून मिटिंग ठरवतो, असे सांगितले. दुसर्‍या दिवशी पुन्हा रियाजने त्यांना फोन करून राहुल कुल यांना भेटण्याबाबत विचारणा केली होती. त्याच दिवशी रियाज हा ओबेरॉय हॉटेलमध्ये राहुल कुल यांना भेटला होता. त्यांच्यात तब्बल दीड तास मिटिंग झाली होती. यावेळी त्याने महाराष्ट्र शासनाच्या नवीन मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू, त्यासाठी त्यांना शंभर कोटी रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. मात्र ही रक्‍कम जास्त असल्याने त्याने 90 कोटी रुपये घेण्याचे मान्य केले. त्यापैकी वीस टक्के म्हणजे अठरा कोटी आधी आणि उर्वरित रक्‍कम मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देण्यास सांगितले होते. ही रक्‍कम उद्या घेण्यासाठी येऊ, असे सांगून रियाज हा तेथून निघून गेला. हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच आमदार राहुल कुल यांच्या वतीने ओंकार थोरात यांनी खंडणीविरोधी पथकात रियाजविरुद्ध तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर त्यांनी रियाजला सोमवारी 18 जुलैला नरिमन पॉईंट येथील एलआयजी इमारतीजवळ बोलावले होते. ठरल्याप्रमाणे रियाज तिथे आला. त्यानंतर ते दोघेही राहुल कुल यांना भेटण्यासाठी ओबेरॉय हॉटेलमध्ये आले होते. याच दरम्यान खंडणीविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी रियाजला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याच्या इतर तीन सहकार्‍यांची नावे समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी योगेश कुलकर्णी, जाफर उस्मानी आणि सागर संगवई या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी नऊ मोबाईलसह नऊ सीमकार्ड जप्त केली आहे. या चौघांविरुद्ध नंतर मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात फसवणुकीच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात मंत्रिपदाचे गाजर दाखवून या चौघांनी आमदाराची फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.

  • प्राथमिक तपासात या टोळीचा म्होरक्या रियाज असून, तो कोल्हापूरच्या हातकणंगले, पुलाची शिरोलीचा रहिवासी आहे. योगेश हा ठाण्याच्या पाचपाखाडी, सागर पोखरण रोड क्रमांक दोन, जाफर हा नागपाड्याच्या हुजरिया स्ट्रिट, बरकत अली मार्गचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर या चौघांनाही मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

Back to top button