चर्चगेट-विरार लोकल अधिक वेगवान | पुढारी

चर्चगेट-विरार लोकल अधिक वेगवान

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या काही दिवसापासून रखडलेल्या मुंबई सेंट्रल-बोरिवलीदरम्यान पाचव्या- सहाव्या रेल्वे मार्गाच्या कामाला वेग देण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. तसेच या मार्गाचा आराखडाही तयार केला आहे. येत्या पाच वर्षांत पाचवा-सहावा रेल्वे मार्ग खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे मेल, एक्सप्रेसकरिता स्वतंत्र रेल्वे मार्ग उपलब्ध होईल. तसेच भविष्यात चर्चगेट-विरारदरम्यान लोकलच्या फेर्‍या वाढून जलद लोकल प्रवास अधिक वेगवान होईल.

बोरिवली ते विरार पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गाचे काम एमआरव्हीसी करीत आहे. या प्रकल्पासाठी दोन हजार 184 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचे ड्रोन सर्वेक्षण पूर्ण झाले असून भूसंपादनाचा प्रस्ताव मुंबई, ठाणे, पालघर जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यात आला आहे.

या प्रकल्पाची संकल्पना योजनाही मंजूर केली आहे. मार्गात पादचारीपूल, भुयारी मार्गाचाही समावेश आहे. मुंबई सेन्ट्रल-बोरिवली दरम्यानच्या पट्ट्यात वांद्र्यापासून बोरिवलीपर्यंत पाचव्या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. तर मुंबई सेन्ट्रल ते दादरदरम्यान कामे पूर्ण केली आहेत. मात्र वांद्रे ते माहिमपर्यंत पाचवा मार्ग आजही रखडला आहे. या मार्गात अतिक्रमणे अडथळा बनली असून काही स्थानिकांनी स्थलांतर करण्यास विरोध केला आहे. यामुळे या टप्प्यातील मार्गाचे काम रखडले आहे.

लोकल फेर्‍याही वाढणार

सध्या चर्चगेट-विरारदरम्यान दोन धीम्या आणि दोन जलद मार्ग उपलब्ध आहेत. पाचवा-सहावा मार्ग नसल्याने मेल, एक्सप्रेस जलद मार्गावरुनच धावतात. त्याचा परिणाम लोकलचे वेळापत्रक आणि मेल, एक्सप्रेस गाड्यांवर होतो. पाचवा-सहावा मार्ग सुरू झाल्यास चर्चगेट- विरारदरम्यान जलद लोकल प्रवास आणखी वेगवान होऊन लोकल फेर्‍याही वाढण्यास मदत होईल.

Back to top button