राज्यात वर्षभरात ४,९६६ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू | पुढारी

राज्यात वर्षभरात ४,९६६ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचा मृत्यू

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :   गेल्या वर्षभरात राज्यात 4,966 दुचाकीस्वार आणि सहप्रवाशांना हेल्मेट नसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे मुंबईत दुचाकी चालविणार्‍याबरोबरच सहप्रवाशालाही हेल्मेटसक्ती केली आहे. मात्र हेल्मेट परिधान न केल्याने अपघातांत मृत्यू झालेल्यांचे प्रमाण मुंबईच्या तुलनेत राज्यातील अन्य जिल्हात अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे.

2021 मध्ये राज्यात 4 हजार 966 दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबत प्रवास करणार्‍या सहप्रवाशांचा मृत्यू झाला असून 2020 च्या तुलनेत यात वाढ झाली आहे. मुंबईत एकाही मृत्यूची नोंद नसून सोलापूर, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, चंद्रपूर, सांगली या जिल्ह्यांत 200 पेक्षा अधिक दुचाकी चालक आणि सहप्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 2020 मध्ये हेल्मेट न घातल्याने एकूण 4 हजार 878 दुचाकीचालक आणि सह प्रवाशांचा मृत्यू झाला होता. 2016 मध्ये राज्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. त्याला मुंबईत काही प्रमाणात, तर पुणे, कोल्हापूर व अन्य भागात कडाडून विरोध झाला होता.

मुंबईत हेल्मेटसक्ती

मुंबईत पुन्हा एकदा हेल्मेटसक्ती केली असून दुचाकीवरील सहप्रवाशानेही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यास वाहन कायद्यानुसार 500 रुपये दंड तसेच तीन महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्यात येते. परंतु हेल्मेट परिधान न केल्याने होणार्‍या अपघातांत मृत्यूचे प्रमाण मुंबईत कमी आहे.

हेल्मेट घातले नसल्याने 2020 मध्ये झालेल्या अपघातात मुंबईत 20, ठाण्यात 15, पुणे शहरात 79, नाशिक शहरामध्ये 94, नागपूर शहरात 83 जणांचा मृत्यू झाला आहे. 2021 मध्ये मुंबई आणि ठाण्यात एकाचाही मृत्यू झाला नसून पुणे शहरात 130, नाशिक शहरात 105 आणि नागपूर शहरात 89 जणांचा मृत्यू आहे.

Back to top button