आमदार देशमुख निसटले नाहीत; तर सन्मानाने परतले | पुढारी

आमदार देशमुख निसटले नाहीत; तर सन्मानाने परतले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  बंडखोरी केलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांनी स्वत:ची सुटका करून घेतली नसून त्यांना सन्मानाने चार्टर्ड विमानातून परत पाठविण्यात आल्याचा खुलासा शिंदे यांच्या गटाने केला आहे. सोबत पुराव्यादाखल काही छायाचित्रेही उघड करण्यात आली आहेत.

आमदार नितीन देशमुख यांनी गुवाहाटीवरून परत आल्यानंतर आपण स्वत:ची सुटका करून पळून आल्याचा दावा केला होता. तो शिंदे गटाने खोडून काढला आहे. देशमुख यांनी पत्नी आजारी असल्याचे सांगितल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार त्यांना चार्टर्ड विमानाने नागपूरला पोहोचविण्यात आले. त्यांच्यावर कोणतीही जबरदस्ती करण्यात आली नाही. त्यांचे कोणीही अपहरण केले नव्हते. उलट सन्मानाने त्यांना अकोल्यापर्यंत पोहोचविण्यात आले. सोबत दोन कार्यकर्तेही पाठविल्याचे शिंदे गटाने म्हटले आहे.

आमदार कैलास पाटील यांनीही महाराष्ट्राची दिशाभूल केली, असा आरोप शिंदे गटात सहभागी असलेले माजी मंत्री आणि शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी केला. कैलास पाटील यांची सुरतमधून मुंबईकडे परतीच्या प्रवासाची आम्ही व्यवस्था करून दिली, त्यामुळे पाऊस पडत असताना ते 4 किलोमीटर चालत गेले असल्याचा दावा साफ खोटा असल्याचे सावंत यांनी सांगितले.

Back to top button