शिंदे आमचे गटनेते, प्रतोदपदी गोगावले | पुढारी

शिंदे आमचे गटनेते, प्रतोदपदी गोगावले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  शिवसेना आणि बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आता कायदेशीर वळणावर पोहोचला असून, बंडखोर गटाने शिवसेनेचे गटनेते म्हणून बुधवारी शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्‍कामोर्तब केले. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांना हटवून महाडचे आमदार भरत गोगावले यांची नियुक्‍ती करणारे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले.

हे लेटरवॉर सुरू झाले ते शिवसेनेच्या पहिल्या पत्राने. बुधवारी संध्याकाळी पाच वाजता बोलावलेल्या आमदार बैठकीला उपस्थित राहा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देणारे पत्र शिवसेना मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी सेनेच्या सर्व आमदारांना पाठवले. बंडखोर आमदारांनी विधिमंडळ सचिवालयाला दिलेल्या ई-मेल आयडीवरही हे पत्र पाठवले गेले.

त्यापाठोपाठ शिंदे गटाने प्रभू यांचीच प्रतोद पदावरून हकालपट्टी करत भरत गोगावले यांची नियुक्ती केली. तसेच शिवसेनेचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते हे एकनाथ शिंदे हेच असून अनिल चौधरी यांची केलेली नियुक्ती अवैध आहे, असा दावाही केला. गोगावले यांची प्रतोदपदी नियुक्ती स्वत: एकनाथ शिंदे यांनी ट्विट केली. तसे पत्रही विधानसभा उपाध्यक्षांना पाठविले. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद गोगावले असल्यामुळे मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनी काढलेले आदेश अवैध आहेत. ते शिवसेना आमदारांना लागू नाहीत, असा पवित्राही शिंदे गटाने घेतला. परिणामी, शिवसेनेचा मुख्य प्रतोद कोण हा आता तांत्रिक मुद्दा निर्माण झाला आहे.

पत्रावर 34 आमदारांच्या सह्या

शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 35 पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याने संख्याबळ शिंदे गटाच्या बाजूने दिसते. उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक घेत शिंदे यांची विधिमंडळ गटनेतेपदावरून हकालपट्टी करत शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची नियुक्ती केली.

मात्र ही नियुक्ती देखील अवैध ठरवणार्‍या या पत्रावर 34 आमदारांच्या सह्या आहेत. त्यात निव्वळ शिवसेनेचे 30 आमदार आहेत तर बच्चू कडू, राजकुमार पटेल, राजेंद्र पाटील – यड्रावकर, नरेंद्र भोंडेकर या चार अपक्षांच्याही सह्या आहेत. या आमदारांनीही शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे हेच असल्याचे म्हटले आहे. सह्या करणार्‍यांपैकी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख मात्र राज्यात परतले असून, आपण उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिंदेंसोबत असलेले संख्याबळ अटीतटीच्या प्रसंगी वाढते की कमी होते हेदेखील बघावे लागेल.

सरकारमधील भ्रष्टाचाराला कंटाळलो

शिंदे गटाच्या आमदारांनी पत्रात एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून समर्थन देताना राज्य सरकारमधील भ्रष्टाचारामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.आम्ही एकमताने एकनाथ शिंदे यांची 31 ऑक्टोबर 2019 मध्ये शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते म्हणून निवड केली होती. 2019 साली झालेल्या 14 व्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी निवडणूकपूर्व युती झाली होती.
मात्र सरकारमधील भ्रष्टाचारामुळे पक्षातील सदस्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान मंत्री नवाब मलिक हे तुरुंगात आहेत.

मलिक हे तर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या आरोपांवरुन तुरुंगात आहेत. देशमुख यांनी पोलिसांच्या नियुक्त्यांबरोबरच मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार केला. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आम्हाला या अडीच वर्षांच्या कालावधीमध्ये लोकांतून बरेच ऐकावे लागले, असा आरोप शिंदे गटाने केला आहे. त्याचवेळी सत्ताधारी पक्षाकडून सरकार असल्याने ते सत्तेचा आणि यंत्रणेचा वापर करुन आमचा छळ करत आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Back to top button