लॉकडाऊन : राज्यातील १ लाख रेस्टॉरंट व ३ हजार हॉटेलना टाळे | पुढारी

लॉकडाऊन : राज्यातील १ लाख रेस्टॉरंट व ३ हजार हॉटेलना टाळे

मुंबई : चेतन ननावरे : दीड वर्षातील लॉकडाऊन च्या निर्बंधांमुळे राज्यातील तब्बल एक लाख रेस्टॉरंट्स आणि तीन हजार हॉटेलना टाळे लागल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेस्टॉरंट्स आणि हॉटेल बंद झाल्याने या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या 25 लाख कामगारांना रोजगार गमवावा लागला आहे, तर राज्याला महिन्याला सुमारे पाच हजार कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.

हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियानेे दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड वर्षांतील लॉकडाऊनच्या विविध निर्बंधांमुळे रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यवसाय पुरता बुडाला आहे.

राज्यात लॉकडाऊनआधी 2 लाख 10 हजार रेस्टॉरंट्स आणि 10 हजार 500 हॉटेल कार्यरत होते. मात्र, आजघडीला रेस्टॉरंट्सची संख्या तब्बल 50 टक्क्यांनी घटली असून, हॉटेल्सच्या संख्येतही 30 टक्क्यांची घट झाली आहे.

या क्षेत्रावर तब्बल 50 लाख लोकांचा प्रत्यक्ष रोजगार अवलंबून आहे. मात्र, बंद पडलेल्या रेस्टॉरंट्समुळे 14 लाख कामगारांच्या रोजगारावर गदा आली आहे. पर्यटनस्थळेच बंद असल्याने हॉटेल्स व्यवसायात काम करणार्‍या 11 लाख नोकर्‍या कमी झाल्या.

एचआरएडब्ल्यूआय संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप शेट्टी म्हणाले की, लॉकडाऊन निर्बंधांमुळे गेल्या दीड वर्षापासून मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांत ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना सुरू आहे. परिणामी, कॉर्पोरेट्स कार्यालये बंद असल्याने रेस्टॉरंट्स ओस पडली आहेत. तसेच पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांअभावी हॉटेलनाही टाळे लागू लागले आहेत.

रेस्टॉरंट्सचा प्रमुख व्यवसाय हा वीकेंडला असतो. मात्र, वीकेंड लॉकडाऊनमुळे ग्राहक घराबाहेर पडत नाहीत.रेस्टॉरंट्सना सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली जात आहे.

मुळात रेस्टॉरंट्समध्ये 80 टक्के ग्राहक हे रात्री आठनंतरच येतात. त्यात आठवड्यातील एकूण ग्राहकांच्या तुलनेत 75 टक्के ग्राहक शनिवार व रविवार असे वीकेंडला रेस्टॉरंट्समध्ये जेवणे पसंत करतात. मात्र, या सर्व गोष्टींचा विचार प्रशासन करत नसल्याने या उद्योगाला सर्वाधिक चटके सहन करावे लागत आहेत.

राज्यातील रेस्टॉरंट्स व हॉटेलमधील 25 लाख बेरोजगारांबाबत मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे. याशिवाय दोन व्यावसायिकांच्या आत्महत्यांनंतर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा फेरआढावा घेणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आठवडाभरात रुग्णसंख्या वाढली नाही, तर योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासित केले आहे, अशी माहिती आहारचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी दिली.

मुंबईतील बंद पडलेली नामांकित रेस्टॉरंटस्

इंडिगो (वांद्रे), किचन गार्डन बाय सुझेट्ट, पा पा या (कुलाबा), फ्ली बाजार, हाऊस ऑप टिप्सी (वांद्रे), बोस्टन बट (वांद्रे), उनो मास् (बीकेसी), सँचोस (वांद्रे), कार्डबोर्ड (बीकेसी), अर्थ (वांद्रे), एफओओ (बीकेसी), कुलाबा अँड काळाघोडा गॅरेज, पँट्री, ली कॅफे 15, मै (ओरिएंटल फूड), बार स्टॉक एक्सचेंज (खार).

99 वर्षांनंतर रेस्टॉरंटला टाळे

स्वातंत्र्यपूर्व काळापासून परदेशी पाहुण्यांसह मुंबईतील खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारे कुलाब्यातील कॅफे रॉयल हेडक्‍वॉर्टर हे रेस्टॉरंट 15 महिन्यांपासून बंद आहे. रेस्टॉरंटचालक प्रणव रुंगटा यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, गेल्या 99 वर्षांपासून सुरू असलेले हे रेस्टॉरंट आम्ही 11 वर्षांपासून चालवत आहोत. रिगल सिनेमागृहासारख्या प्राईम लोकेशनला असल्याने नेहमीच येथे ग्राहकांची गर्दी असे.

मात्र, लॉकडाऊनमुळे पर्यटन बंद असल्याने आता येथे ग्राहक फिरकत नाहीत. तब्बल 3 हजार चौरस फूट रेस्टॉरंटचे मासिक भाडे, 35 कामगारांचे वेतन, उत्पादन शुल्क विभागाचे वर्षाचे सात लाख रुपयांचे शुल्क, अडीच लाख रुपये वीजबिल असा सगळा आर्थिक लेखाजोखा पाहता पार्सल सेवेवर रेस्टॉरंट सुरू ठेवणे व्यवहार्य नाही. त्यामुळे नाइलाजाने रेस्टॉरंट मूळ मालकाला परत करावे लागले.

या विभागातील रेस्टॉरंट्सना टाळे

मुंबईतील कुलाब्यासह काळा घोडा, कमला मिल कंपाऊंड, वांद्रे कुर्ला संकुल (बीकेसी), खार, वांद्रे लिंक रोड या परिसरातील रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स मोठ्या संख्येने बंद पडली आहेत.

स्थानिक आणि विशेषतः परदेशी पर्यटकांसह तरुणाई मोठ्या संख्येने याठिकाणी वीकेंडला रात्रभर चंगळ करण्यासाठी जात होती.

वीकेंड लॉकडाऊन आणि चारनंतर रेस्टॉरंट बंद ठेवावे लागत असल्याने या विभागातील 100हून अधिक रेस्टॉरंट्सनी गाशा गुंडाळला.

Back to top button