मुंबई : पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोष मुक्त | पुढारी

मुंबई : पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोष मुक्त

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारल्याचा आरोप असलेल्या महिलेची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. नववर्षाच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेेत पोलीस ठोस पुरावे सादर करू शकले नाहीत. तसेच सरकारी पक्ष न्यायालयात महिलेवरील मारहाणीचा आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरले, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई पोलीस दलाला चांगलाच झटका बसला आहे.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील एक पब बंद होण्याच्या वेळी हाणामारी झाली. त्यावेळी एका महिला पोलीस कॉन्स्टेबलला पबमधील 44 वर्षीय ग्राहक महिलेने थप्पड मारली होती. या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला होता.

आरोपी महिला पबमध्ये पहाटे 1.30 च्या सुमारास संगीत वाजवण्याची मागणी करत होती. त्यावर पब पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू राहील, असे सांगून पब व्यवस्थापकाने ग्राहकांकडून पैसे घेतल्याचा दावा आरोपी महिलेने केला. आरोपी महिला आणि इतर लोक पबमध्ये पैसे परत करण्याची मागणी करत असताना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी गोंधळ ऐकला आणि त्यांनी पबमध्ये प्रवेश केला होता. यावेळी महिला कॉन्स्टेबलला आरोपी महिलेने थप्पड मारल्याचा आरोप होता.याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

घटना घडली तेव्हा पबमध्ये सुमारे 200 लोक उपस्थित होते, तरीही कोणताही स्वतंत्र साक्षीदार का सादर केला नाही? यासह इतर ठोस पुरावे सादर करण्यात सरकारी पक्ष अयशस्वी ठरला आहे, असे न्यायालय स्पष्ट केले.

एखाद्या पोलीस कर्मचार्‍याला शासकीय कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याच्या किंवा परावृत्त करण्याच्या हेतूने चापट मारणे, तसेच जेव्हा आरोपी स्वतःला वाचवण्यासाठी मागून पकडला जातो, तेव्हा पोलीस कर्मचार्‍याच्या गालाला स्पर्श करणे, ही दोन वेगवेगळी कृत्ये आहेत, असे नमूद करीत न्यायालयाने आरोपी महिलेची थप्पड मारल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली.

Back to top button