सलीम फ्रूट यांच्यासह 18 जणांची चौकशी सुरूच | पुढारी

सलीम फ्रूट यांच्यासह 18 जणांची चौकशी सुरूच

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मुंबई आणि ठाण्यात छापेमारी केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित 18 जण राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) रडारवर आहेत. या सर्वांकडे एनआयएसोबतच केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आयबी आणि सक्तवसुली संचालनालयाच्या पथकाने सलग तिसर्‍या दिवशी कसून चौकशी केली.

केंद्रीय यंत्रणाच्या रडारवर असलेल्यांचा काही ना काही संबंध हा मुंबईत घडलेल्या 93 सालच्या साखळी बॉम्बस्फोटांशी असल्याची माहिती मिळते. एनआयएकडून चौकशी सुरू असलेल्यांमध्ये दाऊदचा विश्वासू शकील शेख उर्फ छोटा शकील याचा साडू सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट आणि बांधकाम व्यावसायिक सोहेल खंडवानी यांच्यासह अजय गोसालिया, गुड्डू पठाण, मुनाफ शेख, अस्लम पठाणी, समीर हिंगोरिया, कय्युम शेख, आरिफ शेख आदींचा समावेश असल्याचे समजते. एनआयएने बुधवारी रात्री उशिरापर्यंत या सर्वांकडे चौकशी केल्यानंतर त्यांना काही कागदपत्रांसह गुरुवारी पुन्हा चौकशीला बोलावले आहे.

दाऊदच्या मुंबईसह देशभरात पसरलेल्या साम्राज्याची माहिती गोळा करण्यासोबतच खंडणीवसुली, सेटलमेंट, ड्रग्ज तस्करी आणि हवाला रॅकेट यातील आर्थिक व्यवहार आणि सिंडिकेटचा तपास सुद्धा केला जात आहे. सोबतच राज्य सरकारमधील सध्या कोठडीत असलेल्या एका मंत्र्याचा या सर्व प्रकरणातील सहभाग तपासला जात असल्याची माहिती मिळते.

Back to top button