राज्यातील ९२ टक्के मशिदींमध्ये भोंग्यांविना अजान | पुढारी

राज्यातील ९२ टक्के मशिदींमध्ये भोंग्यांविना अजान

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे राज्यात 90 ते 92 टक्के मशिदींमध्ये बुधवारी पहाटे भोंगा न लावताच अजान झाली. याबद्दल संबंधित मौलवींचे आभार मानतानाच प्रश्न आवाज कमी-जास्त करण्याचा नाही, जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला.

उत्स्फूर्तपणे सकाळच्या अजानसाठी भोंगा न वापरल्याबद्दल त्या-त्या मशिदींतील इमाम, मौलवींचा मी आभारी आहे, असे राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्यभरात मनसेचे मशिदींवरील भोेंग्यांविरुद्ध आंदोलन सुरू झाले असून भोंग्यांवर अजान वाजेल तिथे हनुमान चालिसा लावला जात आहे. यातून संघर्ष उद्भवू नये म्हणून पोलिसांनी मुंबईसह अनेक शहरांत मनसे पदाधिकार्‍यांची धरपकड सुरू केली. या पार्श्वभूमीवर आपल्या शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. भोंगे लावू नका इतकेच आम्ही सांगितले. लोकांनी ते मान्य केले आणि मौलवींनाही विषय समजला. सरकारपर्यंतदेखील हा विषय पोहोचला. त्याबद्दल पोलीस दलाला धन्यवाद देत राज म्हणाले, मुंबईतील 1140 पैकी 135 मशिदींमध्ये बुधवारी पहाटे भोंगा लावून अजान देण्यात आली. या सर्व मशिदींवर कारवाई करणार का? हा विषय धार्मिक नाही. सामाजिक आहे. केवळ मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न नाही. मंदिरांवरील भोंग्यांचाही त्रास होत असेल

तर तो बंद व्हायला हवा. दिवसभर भोंग्यावरून जी अजान दिली जाते, बांग दिली जाते ती थांबली पाहिजे.
मुंबईतील बहुतांश मशिदी अनधिकृत आहेत. त्या अनधिकृत मशिदींवर भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी देता, असा सवाल करीत राज म्हणाले, मशिदींना वर्षभरासाठी भोंग्यांची परवानगी मिळतेच कशी? आम्हाला परवानगी देताना दिवसाची देता. सणासुदीला 10-12 दिवसांची देता. मग यांना 365 दिवस परवानगी कशी?

बुधवारी सकाळपासून महाराष्ट्रातून फोन येत होते. अजान झाली नसल्याचे कळवले जात होते. कुठेही राडा झाला नसताना पोलीस मनसैनिकांना नोटीसा पाठवत आहेत. मनसैनिकांना ताब्यात घेतले जातेय. हे आमच्या बाबतीतच का घडते? जे कायदा पाळत नाहीत, नियमभंग करून भोंगे लावत अजान देतात त्यांना मोकळीक दिली जात आहे. पण आमचे आंदोलन एक दिवसापुरते नाही. जोपर्यंत भोेंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. ज्या ज्या मशिदींतील मौलवी ऐकणार नाहीत तिकडे आमचे कार्यकर्ते जातील. लाऊडस्पीकर लावतील आणि दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवणार म्हणजे वाजवणार, असा इशाराही राज यांनी दिला.

हिंदुत्वाचा गळा घोटला

मनसेचे भोंगा प्रकरण हे हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. भाजपने मनसेला पुढे करून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मनसेच्या आधाराने भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटला. लाऊडस्पीकर न लागल्याने लाखो हिंदू भाविकांची गैरसोय झाली. सकाळपासून अनेक लोकांनी तक्रारी केल्या अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. तर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, भोंग्यांबाबत सरकारला कोणीही अल्टीमेटम देऊ शकत नाही. भोंग्याआडून काहीजण राजकारण करत आहेत. त्यांच्यामुळे शिर्डीला लाऊडस्पीकरवर काकड आरती झाली नाही.

मुंब्रा, ठाणे, भिवंडीत भोंग्यांविना अजान

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी मशिदींमध्ये बुधवारी पहाटेची अजान भोंगेविरहित झाली. मुंब्य्रातील दहा, ठाण्यातील दोन मशिदीवर भोंगे लावून अजान होण्याची घटना वगळता ठाणे, मुंब्रा येथील 190 मशिदींवर भोंग्याविना अजान झाली.

तत्पूर्वी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून पोलिसांनी 375 मनसे कार्यकर्त्यांना व इतरांना ताब्यात घेतले तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर येथील 2 हजार 596 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. राबोडी व मुंब्य्रातील प्रमुख मशिदीबाहेर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मुंब्य्रातील बहुतांशी मुस्लिम बांधवांनी स्वत:हून पहाटेची अजान भोंग्यावर न घेण्याचा निर्णय घेतला.मुंब्र्यातील 117 मशिदींपैकी फक्त 10 मशिदींवर भोंग्यावर अजान झाली. अनेक मशिदींनी आवाजाची मर्यादा पाळली. मुंब्रा, राबोडी, डायघर, ठाणे नगर, नौपाडा या परिसरात 181 मशिदी असून त्यांनी भोंग्याविना अजान केली. कापुरबावडी, कासारवडवली, श्रीनगर, कोपरी, वागळे, वर्तकनगर आदी भागात 22 मशिदी आहेत. यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात मनसेचे अविनाश जाधव, पप्पू कदम यांच्याविरोधात विना परवानगी भोंगा वाजविल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

कापुरबावडी येथील जामा मशिदीवरील भोंगे स्वतःहून काढण्यात आले असून त्या मौलवींचा पोलिसांकडून सत्कार करण्यात आला. कुठेही सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने पुरेशी खबरदारी घेतली होती. तब्बल आठ हजाराहून अधिक पोलीस फौजफाटा बुधवारी बंदोबस्त कामी तैनात करण्यात आला होता. त्यात 350 पोलीस अधिकारी तर 7 हजार 500 पोलीस तसेच आरपीएफचे नऊ प्लाटून व 300 होमगार्ड देखील पोलिसांच्या मदतीसाठी तत्पर होते.

ठाण्यातील इंदिरा नगर भागात मनसेच्या काही पदाधिकार्‍यांकडून मशिदसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. तर मनविसेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, मनविसे पदाधिकारी संदीप चव्हाण, मयूर तळेकर यांच्यासह 7 ते 8 कार्यकर्त्यांना चितळसर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यांना सायंकाळी ठाणे सत्र न्यायालयाने अटीशर्तींवर जामीन मंजूर करीत पुढील 13 दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत.

मौलवींचा पुढाकार

भिवंडी : भिवंडी शहरात तब्बल 160 मशिदी आहेत. भिवंडीत मशिदींच्या मौलवींनी या वादात कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी एक पाऊल पुढे येत भिवंडी शहरातील बहुसंख्य मशिदीमधून लाऊडस्पीकरवरील अजान कमी आवाजात देण्यात आली. तर ग्रामीण भागात काही मशिदीमधून अजान भोंग्यावर दिलीच गेली नाही.

कल्याण-डोंबिवलीमध्ये डोंबिवली : अनुचित प्रकार टाळण्यासाठी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागातील लहान-मोठ्या अशा 50 मशिदींसमोर मंगळवारी रात्रीपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, तसेच दंगल विरोधी पथके तैनात करण्यात आली आहेत. बुधवारी तर कल्याण परिसरातील मशिदींमध्ये सकाळच्या सुमारास अजान भोंग्यांविना झाली. काही ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आवाजाच्या मापन तीव्रतेप्रमाणे ध्वनिक्षेपकाचा अजानसाठी उपयोग होत असल्याचे एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले.

Back to top button