समृद्धी महामार्ग डेडलाईन हुकणार? | पुढारी

समृद्धी महामार्ग डेडलाईन हुकणार?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावर एकाच महिन्यात घडलेल्या अपघातांचा परिणाम महामार्गाच्या कामावर होणार असून महामार्ग पूर्णपणे कार्यान्वित होण्याचा कालावधी वाढण्याची दाट शक्यता आहे. शिवाय प्रकल्पाचा खर्चही वाढू शकतो.

2 एप्रिल रोजी नागपूर ते शेलू बाजार हा महामार्गाचा पहिला टप्पा सुरु होणार होता. हा पट्टा वन्यजीवांचा वावर असणारा आहे. वन्यजीव रस्ता ओलांडताना महामार्गावर येऊ नयेत, त्यांच्या अधिवासाला धक्का पोहोचू नये यासाठी या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर उन्नत मार्ग तसेच अंडरपास बांधले जात आहेत. या अंडरपासमुळे वन्यजीव थेट महामार्गावर येणार नाहीत, अंडरपासमधून ये-जा करतील, अशी रचना आहे.

या ठिकाणी उन्नत मार्ग बांधताना पुलाचा काही भाग कोसळून बांधकामाचे मोठे नुकसान झाले होते. डागडुजी करण्यासाठी किमान दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. परिणामी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर सिंदखेड राजा येथे गर्डर बसवण्याचे काम सुरु होते. मात्र गर्डर क्रेनमधून कोसळला.

या महामार्गावर झालेला हा दुसरा अपघात आहे. या अपघातांमुळे महामार्गाच्या बांधकाम वेगावर परिणाम झाला आहे. यापूर्वी कोरोनामुळे महामार्गाच्या बांधकाम कार्यास खीळ बसली होती. सप्टेंबर 2022 पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनामुळे निर्बंध लागू झाले आणि कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यात आली. आता प्रकल्पाचे काम जुलै 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

तत्पूर्वी फेब्रुवारी 2022 पर्यंत 360 किमीचा पट्टा कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट होते. हा पट्टा नागपूर ते वैजापूर असा आहे. 2022 च्या मध्यापर्यंत नागपूर ते वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार आणि बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते वैजापूर हा पट्टा पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु हे उद्दिष्ट साध्य करता आले नाही.

2015 साली प्रकल्पाची घोषणा झाली. 2017 साली भूसंपादनाला सुरुवात झाली. डिसेंबर 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचे भूमिपूजन झाले.

घटनाक्रम

2015 – मुंबई नागपूर एक्सप्रेसवे ग्रीनफिल्ड प्रकल्प म्हणून घोषित
मे 2016- प्रकल्प अहवालासाठी सल्लागार नियुक्त
जानेवारो 2017 – नागरी कामांसाठी निविदा मागवल्या
जुलै 2017 – भूसंपादन सुरु
मे 2018 – आर्थिक निविदा मागवल्या.
जून 2018 – कमी बोली लावणारी निविदा मंजूर
डिसेंबर 2018 – पंतप्रधानांनी केली पायाभरणी
मार्च 2020- 86 टक्के भूसंपादन पूर्ण
जुलै 2020 – 40 टक्के बांधकाम पूर्ण
जुलै 2021 – 60 टक्के बांधकाम पूर्ण
सप्टेंबर 2021 – इगतपुरीमधील सर्वात मोठा बोगदा पूर्ण
डिसेंबर 2021 – 70 टक्के काम पूर्ण
फेब्रुवारी 2022 अखेर – नागपूर ते वैजापूर मार्गाचा प्रारंभ
2022 च्या मध्यात – नागपूर ते शेलू बाजार मार्ग पूर्ण होणे अपेक्षित होते
मार्च 2023 – संपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

Back to top button