मुंबई : राज्य पोलीस दलात मोठी उलथापालथ | पुढारी

मुंबई : राज्य पोलीस दलात मोठी उलथापालथ

नवी मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्य पोलीसदलात बुधवारी मोठी उलथापालथ झाली. तब्बल 32 पोलीस आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, सहआयुक्त, उपमहानिरीक्षक, अपर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या असून, पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचे धडाकेबाज काम करणारे सात ते आठ अधिकारी एका झटक्यात साईड ब्रँचला म्हणजेच बाजूला फेकले गेले आहेत.

राज्य पोलीस दलात दरवर्षी एप्रिल महिना बदल्यांचा हंगाम म्हणून ओळखला जातो. या महिन्यात पहिल्या टप्प्यात आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या होतात. त्यानुसार बुधवारी काही बदल्या पदोन्नतीने, काही बदल्या गृह खात्याची नाराजी म्हणून तर काही बदल्या कालावधी पूर्ण झाल्याने करण्यात आल्या आहेत. मात्र पदोन्नतीच्या बदल्या करताना संबंधित अधिकार्‍यांना कटाक्षाने बाजूला टाकण्यात आले आहे.

जमिनींच्या वादात निवाडा करण्याचे महसूल अधिकार्‍यांचे अधिकार काढून घ्या, अशी मागणी करून खळबळ उडवून देणारे नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना महिला अत्याचार प्रतिबंधक विभागात पाठवण्यात आले आहे. महसूल खात्याविरुद्ध टाकलेला लेटरबॉम्बच त्यांना नडला, असे म्हटले जाते.

मुंबईचा गुन्हे विभाग हाताळणारे सहआयुक्त मिलिंद भारंबे आता कायदा सुव्यवस्था विभागाचे प्रमुख म्हणून बसतील. त्यांच्या जागी सुहास वारके हे मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त म्हणून येत आहेत. पुणे शहरचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना तर थेट राज्य मानवी हक्क आयोग स्पेशल आयजी पदावर पाठवण्यात आले आहे. प्रसंगी वेषांतर करून गुन्हेगारांना पकडणारे पिंपरी चिंचवडचे डॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना व्हीआयपी सुरक्षा विभागात पाठविण्यात आले आहे.

मंत्रालयात सुरक्षा विभाग सांभाळणारे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे पुण्यात एसआरपीएफला जातील. ठाणे एसीबीचे अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांची अपर पोलीस आयुक्त सशस्त्र पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

मुंबई झोन 4 चे उपमहानिरीक्षक विजय पाटील यांना एसीबीत काम करण्याची संधी देण्यात आली आहे. कोकण पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते आणि नाशिक पोलीस उपमहानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर यांना पदोन्नती देत स्पेशल आयजी कोकण आणि नाशिक याच पदावर नियुक्ती देण्यात आली.

शिक्षा कुणाला?

अ‍ॅक्शन झोनमधून कोपर्‍यातील पोस्टवर बदली झालेल्या अधिकार्‍यांमध्ये नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे, मुंबईचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पुण्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश या अधिकार्‍यांचा समावेश आहे.

बक्षीस कुणाला?

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागाचे दत्तात्रय कराळे यांची वर्णी मात्र पुन्हा ठाणे शहर सहआयुक्त पदावर लागली. कराळे यांनी यापूर्वीही डीसीपी, अपर पोलीस आयुक्त म्हणून ठाण्यातच काम केले.

राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या

राज्यातील आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्यांना आणि बढत्यांना अखेर मुहूर्त मिळाला. गृहमंत्रालयाने बुधवारी सायंकाळी या संदर्भातील आदेश जारी केले आहेत. यात पोलीस उपायुक्त/पोलीस अधीक्षकपदावरील 11 अधिकार्‍यांना आणि अप्पर पोलीस आयुक्त/पोलीस उपमहानिरीक्षक पदावरील 14 अधिकार्‍यांना बढत्या देण्यात आल्या आहेत.

मुंबई पोलीस दलातील परिमंडळ तीनचे उपायुक्त परमजीतसिंह दहीया यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदी बढती देत राज्य दहशतवादविरोधी पथक येथे, उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक यांना बढती देत नागपूर शहरच्या दक्षिण प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी, राज्य गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र माने यांना बढती देत ठाणे शहरच्या पूर्व प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना बढती देत पुणे शहरच्या सहआयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. ठाणे शहरचे सहआयुक्त सुरेशकुमार मेकला यांची गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक लख्मी गौतम यांना बढती देत राज्य पोलीस दलाच्या आस्थापना विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी, मुंबई पोलीस दलातील वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सत्यनारायण यांना बढती देत राज्याच्या सागरी सुरक्षेच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयातील अप्पर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांना बढती देत राज्य पोलीस दलाच्या प्रशासन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पडवळ यांना बढती देत मुंबई पोलिसांच्या अर्थिक गुन्हेशाखेच्या सहपोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, मुंबई पोलीस दलातील सशस्त्र दलाचे अप्पर पोलीस आयुक्त विरेंद्र मिश्रा यांची मुंबईतील उत्तर प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलातील संरक्षण व सुरक्षा विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त निशिथ मिश्रा यांना विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बढती देऊन राज्य दहशतवादविरोधी पथकात आणि नागपूर शहर पोलीस दलातील गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सुनिल फुलारी यांना बढती देऊन मोटार परिवहन विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कोकण परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय मोहिते यांना बढती देत कोकण परिक्षेत्राचे पद उन्नत करुन तेथेच विशेष पोलीस महानिरीक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठाणे शहर पोलीस दलातील प्रशासन विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना बढती देऊन राज्य गुप्तवार्ता अकादमीच्या संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. जालनाचे पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांना बढती देत मुंबई पोलीस दलात पश्चिम प्रादेशिक विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हेशाखेचे उपायुक्त डॉ. महेश पाटील यांना बढती देत मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेत अप्पर पोलीस आयुक्तपदी, महामार्ग सुरक्षा पथक पुणे येथील पोलीस अधीक्षक संजय जाधव यांना बढती ठाणे शहर पोलीस दलाच्या प्रशासन विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मंत्रालय सुरक्षा विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे यांना बढती देत राज्य राखीव पोलीस बल पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली आहे.

Back to top button