राजर्षी शाहू महाराजांचा गिरगावात स्मृतिस्तंभ | पुढारी

राजर्षी शाहू महाराजांचा गिरगावात स्मृतिस्तंभ

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मुंबईतील गिरगाव-खेतवाडीत स्मृतिस्तंभ उभारला जात आहे. दुसर्‍या टप्प्यातील काम पुढील आठवड्यापासून सुरू होत असून, या दगडी स्मृतिस्तंभाचे लोकार्पण 5 मे रोजी होणार असल्याची माहिती कोल्हापूर येथील इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी मंगळवारी दिली.

राजर्षी शाहू महाराज यांचे निधन 6 मे 1922 रोजी गिरगाव, खेतवाडी गल्ली क्र. 13 येथील ‘पन्हाळा लॉज’ या राजवाड्यात झाले. मृत्यू समोर दिसत असताना शाहू छत्रपती अंथरुणावर उठून बसले आणि त्यांनी सोबत्यांना बोलावून घेतले. “मी जाण्यास तयार आहे… डर कुछ नही. सबको सलाम बोलो…” असे सांगत त्यांनी शांतपणे निरोप घेतला. त्यानंतर त्यांचे पार्थिव कोल्हापूरला आणले गेले. तिथे लाखो जनसमुदायाच्या साक्षीने लोकराजा शाहू यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिशताब्दी वर्षात गिरगाव-खेतवाडीतील ‘पन्हाळा लॉॅज’जवळ स्मृतिस्तंभ उभारण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ली (ता.पन्हाळा) येथून हा दगडी स्मृतिस्तंभ दोन दिवसांपूर्वी मुंबईत दाखल झाला. महापालिकेने पायाचे काम 18 एप्रिलला पूर्ण केले; स्मृतिस्तंभ उभारण्याचे दुसर्‍या टप्प्यातील काम पुढील आठवड्यात सुरू होईल.

लोकराजा शाहू यांच्या स्मृतिस्तंभासाठी साठी माजी आमदार मालोजीराजे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, मराठा महासंघाचे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, हर्षल सुर्वे यांनी पाठपुरावा केला. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे,कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या सहकार्याने मुंबई महापालिकेतर्फे हा स्मृतिस्तंभ उभारण्यात येत आहे.

केर्लीत साकारला बसाल्ट स्मृतिस्तंभ

पन्हाळा तालुक्यातील केर्ली येथेे काळ्या कातळातून हा स्मृतिस्तंभ घडवण्यात आला. शिल्पकार ओंकार कोळेकर व दीपक गवळी यांनी बसाल्ट दगडात 10 फूट उंच व 38 इंच रुंदीचे हे स्मृतिशिल्प साकारले आहे.

Back to top button