मुंबई : परीक्षाकाळात सीईटी आयुक्तांची बदली | पुढारी

मुंबई : परीक्षाकाळात सीईटी आयुक्तांची बदली

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील तब्बल 8 लाखाहून अधिक नोंदणी असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षा आणि त्यासाठीची प्रक्रिया सुरू असतानाच राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेलचे (सीईटी सेल)आयुक्त रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली आहे.

सरकारने गेल्या सहा वर्षांत 8 ते 9 आयुक्त सीईटी सेलला दिले आहेत. लाखो विद्यार्थ्यांची प्रवेश यंत्रणा सांभाळत असलेल्या सीईटी सेलला सलग तीन वर्षे सनदी अधिकारी मिळालेला नाही. यामुळे आता नव्याने येणारे आयुक्त तरी थांबणार की, सहा महिन्यांत दुसरे येणार, अशी चर्चा रंगली आहे.

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा एका छत्राखाली आणण्याचा निर्णय 2015 मध्ये सरकारने घेतल्यानंतर राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची (सीईटी सेल) स्थापना केली. त्यानंतर प्रवेश नियामक प्राधिकरण (एआरए) आणि राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्ष (सीईटी सेल) एकत्र आणले.

दक्षिण मुंबईत अत्याधुनिक सुविधायुक्त कार्यालय तयार केले. एक खिडकी पद्धतीद्वारे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाच्या नियोजनासाठी हा कक्ष स्थापन केला. परीक्षांचे नियोजन योग्य व्हावे, यासाठी या कक्षाच्या आयुक्तपदी सनदी अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची तरतूद कायद्यात आहे.

आनंद रायते यांचा अपवाद वगळता कोणतेही सनदी अधिकारी या पदावर फार काळ टिकले नाहीत. रायते यांनी व्यवस्था सुरळीत केल्या. त्यानंतर त्यांचीही बदली करण्यात आली. त्यानंतर आलेलो संदीप कदम याची कोरोनाकाळातच ऑगस्टमध्ये भंडारा जिल्हाधिकारीपदावर बदली करण्यात आली.

गतवर्षी काही काळ सी.डी. जोशी आयुक्त होते. त्यांची बदली पुण्याला झाल्यानंतर अतिरिक्त कारभार ‘रुसा’चे संचालक पंकजकुमार यांच्याकडे देण्यात आला. त्यानंतर रवींद्र जगताप यांची नियुक्ती सप्टेंबर 2021 मध्ये करण्यात आली. त्यांची बदली महाऊर्जा, पुणे येथे झाली. त्यानंतर 15 दिवस त्यांच्याकडे कार्यभार होता. आता सोमवारी नवीन आयुक्त येणार असल्याचे कळते.

पुण्यातील ‘यशदा’चे महासंचालक चिन्मय गोतमारे यांची सीईटी सेलच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी त्यांचीही बदली नागपूर स्मार्ट सीटी सीईओ म्हणून केली केली आहे. यामुळे आता सीईटी सेलला के. व्ही जाधव हे नवे आयुक्त म्हणून येणार आहेत.

Back to top button