मुंबई : छातीपर्यंत पोहोचलेल्या रेस्ट्रोस्टर्नल थायरॉईडवर यशस्वी शस्त्रक्रिया | पुढारी

मुंबई : छातीपर्यंत पोहोचलेल्या रेस्ट्रोस्टर्नल थायरॉईडवर यशस्वी शस्त्रक्रिया

मुंबई ; तन्मय शिंदे : छातीपर्यंत पोहचलेल्या रेस्ट्रोस्टर्नल थायरॉइडची शस्त्रक्रिया करून सायन रुग्णालयातील डॉक्टरांना मंदाकिनी वाघ (53) महिलेचे प्राण वाचवण्यात यश आले. ही तशी अवघड आणि काहीशी दुर्मीळ शस्त्रक्रिया मानली जाते.

वाघ यांना नोव्हेंबर 2020 मध्ये थकवा आणि श्‍वास घेण्यास त्रास होऊ लागला. मध्यरात्रीच्या सुमारास त्या अस्वस्थ होऊ लागल्याने कुटुंबियांनी त्यांना सायन रुग्णालयात हलवले. तेथे मान आणि छातीचे सीटीस्कॅन करण्याची गरज भासल्याने त्या चाचण्याही झाल्या.

त्यात छातीच्या आतील भागात हृदयाच्या आणि श्‍वासनलिकेच्या मागच्या भागापर्यंत मोठा रेट्रोस्टर्नल थायरॉईड (गलगंड) पसरल्याचे समोर आले. तो किती आहे, हे पाहण्यासाठी डॉक्टरांनी सीटी ब्रॉन्कोस्कोपी करुन श्‍वासनलिकेची तपासणी केली.

त्यात श्‍वसन नलिकेवर थायरॉईडच्या गाठीमुळे दाब पडत असून श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याचे समजले. त्या महिलेचा गलगंड खूप मोठा असून त्याला काढण्यासाठी रुग्णाला (स्टर्नोटोमी) छातीच्या किचकट शस्त्रक्रियेची शक्यता लागणार होती.

वाघ यांचा लठ्ठपणा आणि गलगंडामुळे डॉक्टरांच्या अडचणी वाढल्या. तर भूलतज्ज्ञांसमोर भूल देण्याचे आव्हान होते. हे आव्हान पेलण्यासाठी डअधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक मल्टी स्पेशलिटी टीम तयार केली गेली.

अधिष्ठाता, विभाग प्रमुख डॉ. मोहन जोशी, शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. सुब्रमणियन प्रभाकर, प्रा.डॉ. पल्लवी शंभू आणि डॉ. नितीन अक्यमवार, भूलतज्ज्ञ विभागाचे डॉ. अमला कुडाळकर, डॉ. उर्वी देसाई आणि डॉ. दीपाली ठाकूर, इएनटी विभागाच्या प्रा. डॉ. रेणुका ब्राडो आणि डॉ. जयंत खांडेकर यांनी सर्व धोके पत्करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

रुग्णाला भूल देण्यात आली. मात्र, ऑपरेशनची गरज असताना सुदैवाने कमी प्रयत्नांत शस्त्रक्रियेची प्रक्रिया करणे शक्य झाले. पहिल्यांदा मानेला चिर देऊन हा गलगंड काढण्यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरू झाले.

यानंतर शल्यचिकित्सकांनी संपूर्ण गाठ काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि अत्यंत जिकरीने मानेतूनच गलगंड बाहेर काढण्यात आला आणि छातीची क्लिष्ट शस्त्रक्रिया टाळण्यात शल्यचिकीत्सकना यश आले.

* वाघ यांना 48 तासांच्या कालावधीसाठी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. नंतर ईएनटी ऑपरेशन थिएटरमध्ये ब्रॉन्कोस्कोपिक व्हिजन अंतर्गत व्हेंटिलेटर ट्यूब काढून टाकली गेली. श्‍वसनलिका कोसळणे, शस्त्रक्रियेदरम्यान रक्‍तस्त्राव होणे, ब्रोन्कोप्न्यूमोनिया, शस्त्रक्रियेनंतर श्‍वास घेण्यास त्रास होणे अपेक्षित होते. परंतु उत्कृष्ट नियोजन, प्रीऑपरेटिव्ह वर्कअप आणि मल्टि डिसिप्लिनरी टीमच्या कुशलतेने अडचणी टळल्या. वाघ यांना 10 दिवसांनंतर घरी सोडण्यात आले. अनेक दिवस त्रास सहन केल्यानंतर झालेल्या शस्त्रक्रियेने आता वाघ यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

Back to top button