Kirit Somaiya : नगरविकास अधिकार्‍याच्या खुर्चीवर बसून किरीट सोमय्यांनी चाळल्या फाईल | पुढारी

Kirit Somaiya : नगरविकास अधिकार्‍याच्या खुर्चीवर बसून किरीट सोमय्यांनी चाळल्या फाईल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना अनधिकृत बांधकामाबद्दल केलेला दंड व दंडावरील व्याज माफ करण्याबाबतची फाईल किरीट सोमय्या यांनी थेट नगर विकास अधिकार्‍यांच्या खुर्चीवर बसून पाहिल्याने मंत्रालयात एकच सोमवारी खळबळ उडाली.

आमदार सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केल्यामुळे त्यांच्यावरील दंड माफीचा निर्णय मंत्रिमंडळाने नुकताच घेतला होता. याबाबतची फाइल पाहण्यासाठी सोमय्या यांनी थेट मंत्रालय गाठले आणि मंत्रालयातील नगर विकास खात्याच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांनी अधिकार्‍याच्या खुर्चीवर बसून फाईल बघितल्या. त्यांनी कुठल्या अधिकारात फाईल बघितल्या तसेच अधिकार्यांनी कोणत्या अधिकारात फाईल दाखवल्या याबाबत मंत्रालयात जोरदार चर्चा झाली.

मंत्रालयातून आल्यानंतर त्यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सरनाईक यांचा दंड माफ करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात राज्याच्या लोकायुक्तांकडे अपील करण्यात आले असून पुढील आठवड्यात उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करणार आहोत. यावेळी डॉ. सोमय्या यांनी सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीतील अनधिकृत बांधकामाबद्दल लावलेला दंड व दंडावरील व्याज पूर्णपणे माफ करण्यासंदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीतील टिप्पणीच्या प्रती सादर केल्या.

ते म्हणाले, सरनाईक यांना छाबय्या विहंग गार्डन या इमारतीत केलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल काँग्रेस – राष्ट्रवादीचे सरकार सत्तेत असताना दंड करण्यात आला होता. हा दंड माफ करावा यासाठी सरनाईक यांनी राज्य सरकारकडे अर्ज दाखल केला होता. पण दंड व त्यावरील व्याज माफ करण्यास अर्थ खात्याने विरोध दर्शविला होता. नगरविकास खात्यानेही सरनाईक यांचा दंड माफ करण्यास विरोध केला होता. 4 जानेवारी या संदर्भात लोकायुक्तांपुढे झालेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने सरनाईक यांना केलेला दंड व त्यावरील व्याज माफ करण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र, अर्थ विभागाचा विरोध डावलून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांचा दंड माफ करण्यात आला. सरनाईक यांना दंड व त्यावरील चक्रवाढ व्याज धरून ही रक्कम 18 कोटी इतकी होते, असेही डॉ. सोमय्या यांनी सांगितले.

Back to top button