परभणी : शैक्षणिक फी भरू न शकल्यामुळे मराठा विद्यार्थ्याने संपवले जीवन | पुढारी

परभणी : शैक्षणिक फी भरू न शकल्यामुळे मराठा विद्यार्थ्याने संपवले जीवन

दौडगाव; पुढारी वृत्तसेवा : जिंतूर-संभाजी नगर येथे महाविद्यालयात शिक्षण घेत असताना घरची हालकीची परिस्थिती असल्याने महाविद्यालयाकडून सततचा शैक्षणिक शुल्काचा तगादा यामुळे सतरा वर्षीय विद्यार्थ्याने विषारी औषध पिऊन जीवन संपवले. ही घटना शनिवारी (दि. 21) सकाळी 10 वाजताच्या सुमारास औंढा तालुक्यातील दौंडगाव येथे घडली. संबंधित विद्यार्थ्यास उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषीत केले.

घरात अठरा विश्व दारिद्र्य त्यात वडीलांना जेमतेम एक एकर जमीन व घरात पाच मुली, दोन मूले असा परिवार आहे. संभाजीनगर येथे अकरावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या परमेश्वर विठ्ठल चित्रे (वय १७) या विद्यार्थ्याने स्वतःच्या शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

विद्यार्थी हा मागील वर्षभरापासून संभाजीनगर येथे एका खासगी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. वडिलांकडे त्याने महाविद्यालयाची शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैशाची मागणी केली. यावेळी हालाखीची परिस्थिती असल्याने सोयाबीनची काढणी झाल्यानंतर फी भरू असे आश्वासन वडिलांनी दिले. परमेश्वरच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षणाचे होणारे नुकसान भरून निघणार नसल्याने परमेश्वर विवंचनेत राहत होता. येत्या काही दिवसात परीक्षा असल्यामुळे महाविद्यालयाचा फीसाठीचा तगादा असल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. तर आरक्षण असते तर आपल्याला एवढे पैसे भरण्याची आवश्यकता पडली नसती असेही तो नेहमी म्हणत असायचा.

दरम्यान शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यावेळी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले यावेळी मुलाच्या आईचा आक्रोश पाहून ग्रामीण रूग्णालयात भावनिक वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया चालू होती.

Back to top button