मला कितीही त्रास दिला तरी वाकणार नाही : रोहित पवार | पुढारी

मला कितीही त्रास दिला तरी वाकणार नाही : रोहित पवार

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याची विचारधारा ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची विचारधारा असून महाराष्ट्र कधीही दिल्लीपुढे झुकला नाही. मी तुमच्याकडे येत नाही, तुमचं ऐकत नाही, म्हणून ईडीची कारवाई जाणीवपूर्वक केली जात आहे. मला कितीही त्रास दिला तरी मी वाकणार नाही, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी आज (दि. ११) कन्नड येथे केले. कन्नड येथील बारामती अग्रो साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती अग्रो कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे आ. रोहित पवार यांनी थेट कारखान्यावर येऊन पिकअप गाडीच्या टपावर उभे राहून यासंदर्भात शेतकऱ्यांशी संवाद साधला.

कन्नड साखर कारखाना हा कर्जात बुडाल्याने विक्रीसाठी दोनदा टेंडर निघाली. कुणीही घेण्यासाठी समोर आले नाही. हा कारखाना ३५ कोटीत विकला जाणार होता. आम्ही पन्नास कोटीत घेऊन व्यवस्थित सुरळीत चालू ठेवला. हा कारखाना कुणीही बंद करून शकत नाही, कारण पूर्णपणे पारदर्शकपणे हा कारखाना घेतलेला असून या सर्व प्रकरणी चौकशी होऊन क्लीनचीट देण्यात आलेली आसल्याने कारखाना बंद करता येणार नाही. ईडीच्या जप्तीचे कोणतेही पत्र अद्याप आम्हाला मिळाले नाही. वेळप्रसंगी न्यायालयात जाऊ मात्र हा कारखाना बंद होऊ देणार नाही. एकीकडे संभाजीनगरमध्ये उद्योग करणाऱ्या कंपन्या येणे बंद झाल्या असून सत्तेचा गैरवापर करून तुमचं ऐकत नाही म्हणून सुरू असलेले कारखाने बंद पाडण्याचे उद्योग करता हीच का तुमची गॅरंटी, असा सवाल आ. पवार यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांना केला.

तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करायचे कारण नाही, तुमचे ऊसाचे पैसे काही दिवसात तुमच्या खात्यावर येतील. कारखाना सुरू आसल्याने ऊस उत्पादक शेतकरी, ऊस वाहतूक करणारी यंत्रणा, ऊसतोड कामगार, कारखान्यामधील कामगार यांच्या खिशात दोन पैसे येतात तेच पैसे तालुक्यात येत असल्याने विकास होत आहे. येथे दुसरा कारखाना आहे का?  एमआयडीसी होणार होती झाली का ? आम्ही सर्वसामान्यासाठी,  शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी,  युवकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष यात्रा काढतो म्हणून आमच्याविरुद्ध कारवाई केली जात आहे. वेळप्रसंगी मला तुरुंगात पण टाकतील मात्र मी वाकणार नाही, असेही ते म्हणाले.

कन्नड साखर कारखान्यावरील ईडीच्या चुकीच्या कारवाईमुळे कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम थांबले आहे. ईडीच्या कारवाईची प्रक्रिया संपल्यानंतर कारखान्याच्या विस्तारीकरणाची प्रक्रिया लगेच सुरू होईल. विस्तारीकरण झाल्यानंतर त्याचा फायदा ऊस उत्पादकांना ऊस दरवाढीमध्ये होणार आहे. एकूणच कन्नड कारखान्यामध्ये व बारामती ऍग्रोच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील युनिट क्र. एक मधील ऊस दरामध्ये जी तफावत राहते, ती तफावत कमी होणार आहे. ईडीच्या कारवाईमुळे फक्त कारखान्याचेच नुकसान होत नाही, तर त्याबरोबर पर्यायाने ऊस उत्पादकांचेही नुकसान होते. हे लक्षात घेण्याची गरज आहे, असेही आमदार रोहित पवार यावेळी म्हणाले. यावेळी माजी आमदार किशोर पाटील, पांडुरंग तायडे, बाबासाहेब मोहिते, प्रसन्ना पाटील, सिध्देश्वर झाल्टे, बापू गवळी, आदीसह मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

हेही वाचा :

Back to top button