अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला शिक्षणाच्या प्रवाहात; चार वर्षात १४७ जणींनी पुन्हा धरली शिक्षणाची कास | पुढारी

अर्धवट शिक्षण सोडलेल्या महिला शिक्षणाच्या प्रवाहात; चार वर्षात १४७ जणींनी पुन्हा धरली शिक्षणाची कास

भाग्यश्री जगताप

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : महिला या कोणत्याच क्षेत्रात मागे नाही असे आपण अभिमानाने म्हणतो. पण अनेक महिलांना परिस्थिती किंवा काही कारणास्तव शिक्षण अर्धवट सोडावे लागते नाही तर शिक्षणच घेता येत नाही. मात्र शिक्षणाबाबत त्यांची असलेली जिद्द, आवड त्या सोडत नाही. शहरातील अशाच काही महिला प्रौढ विद्यालयाच्या माध्यमातुन पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आल्या आहेत. शहरातील प्रौढ महिला विद्यालयातुन गेल्या चार वर्षात १४७ जणींनी दहावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आहे.

मराठवाडा सर्व क्षेत्रात मागासलेला राहिला आहे याचे प्रमुख कारण म्हणजे स्त्री शिक्षणाचा प्रौढ शिक्षणाचा अभाव आहे, अशी सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्यांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी १९५० ते १९५८ या कार्यकाळात मराठवाड्यातील लातूर, अंबाजोगाई, नांदेड, परभणी व छत्रपती संभाजीनगर येथे मुक्कामी प्रौढ स्त्रियांच्या शिक्षणासाठी “प्रौढ महिला विद्यालय” या शाळा उघडल्या. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर येथील प्रौढ महिला विद्यालय एवढीच शाळा आस्तित्वात आहे आणि इतर ठिकाणच्या सर्व शाखा बंद पडल्या आहेत. १५ वर्षावरील मुली व प्रौढ स्त्रिया यानांच या विद्यालयात प्रवेश दिला जातो. प्रथम प्रवेश इ. ४थी च्या वर्गात मिळतो. निरक्षर १ ली, २ री, ३ री पर्यंतच्या विद्यार्थीनींना ४ थ्या वर्गात प्रवेश मिळतो. ४ थी पास, ५ वी, ६वी पास, नापास, झालेल्या विद्यार्थीनीस ७व्या वर्गात प्रवेश मिळते. ७ वी पास, ८ वी पास नापास झालेल्या विद्यार्थ्यांनीस ९ व्या वर्गात प्रवेश मिळतो. ९वी पास झालेल्या विद्यार्थीनीस १०वीत प्रवेश मिळतो. अशा रीतीने विद्यार्थीनीस चार वर्षांत एस. एस. सी. उत्तीर्ण होता येते. आत्तापर्यंत ५ ते ७ हजार विद्यार्थीनी (मुली व महिला) स्वावलंबी झाल्या. शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थीनी अत्यंत बिकट परिस्थितीतून शिक्षण घेतात. धुणी, भांडी,घरगुती काम करून शिकणाऱ्या विद्यार्थीनी कुटुंबाची सर्व जबाबदारी सांभाळून शिक्षण घेतात, तसेच रिमांड होम मधील विद्यार्थीनी देखील येथे शिक्षण घेतात. असे म्हटले जाते की, एक पुरुष शिकला तर तो एकटाच सुधारतो आणि एक स्त्री शिकली तर ती संपूर्ण कुटुंब सुधारू शकले समाजाचा विकास होण्यासाठी ही बाब खुप मोलाची आहे. अनेक वर्षांपासून गॅप असलेल्या १०वी अनुत्तीर्ण महिला शिक्षण घेऊन सुशिक्षत होत आहे.

गेल्या चार वर्षात शिक्षण प्रवाहात आलेल्या महिला

वर्ष                    महिलांची संख्या

२०२०-२१       –        ३४

२०२१-२२-      –       ४४

२०२२-२३      –        ३३

२०२३-२४      –        ३६

Back to top button