UPSC Result : नोकरी सांभाळत केला अभ्यास, पाडळीच्या अभिजीत पाखरेंचे युपीएससीमध्ये घवघवीत यश | पुढारी

UPSC Result : नोकरी सांभाळत केला अभ्यास, पाडळीच्या अभिजीत पाखरेंचे युपीएससीमध्ये घवघवीत यश

उदय नागरगोजे

बीड; पुढारी वृत्तसेवा : शिरुर तालुक्यातील पाडळीसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत अभिजीत गहिनीनाथ पाखरे यांनी एमपीएससी परिक्षेत यश मिळवून बीडीओ म्हणून कार्यरत असतांना युपीएससीची तयारी सुरु ठेवली. चार वेळा अपयश येवूनही जिद्द सोडली नाही आणि पाचव्या प्रयत्नात यश मिळवले. अभिजीत पाखरे हे सध्या गडचिरोली जिल्ह्यात आहेरी येथे बीडीओ म्हणून कार्यरत आहेत.

अभिजीत पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बीडमधील चंपावती विद्यालयात झाले. अभिजीत पाखरे यांचे आई वडील शिक्षक आहेत. खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतचे सरपंचही आहेत. 2019 मध्ये अभिजीत पाखरे यांनी एमपीएससीची परिक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यावर नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची पहिली नियुक्ती होणार होती. यावेळी त्यांनी आदिवासीबहुल मागास व अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेचा प्रारंभ करण्यासाठी वरिष्ठांना गडचिरोलीत पोस्टींग द्या अशी विनंती केली. त्यानुसार त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या अत्यंत संवेदनशील ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. शासकीय सेवेत कार्यरत असतांना त्यांनी युपीएससीसाठी तयारी सुरुच ठेवली. चार वेळा अपयश आल्यानंतरही सातत्याने आठ ते दहा तास अभ्यास करत पाचव्या प्रयत्नात यश मिळवले आहे. सध्या ते निवडणूक कर्तव्यावर असतांना ही गोड बातमी समजल्यानंतर कष्टाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

स्वतःहून गडचिरोलीत घेतली पोस्टींग

अभिजीत पाखरे यांना बीडीओ म्हणून नियुक्ती मिळण्यापूर्वी त्यांन प्रधान सचिवांना स्वतःहून गडचिरोलीत पोस्टींग द्या अशी विनंती केली होती. आदिवासी बहुल भागात शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्याचा त्यांचा हेतू होता. या भागात काम करण्याची संधी मिळावी अशी विनंती केल्यानंतर त्यांना अहेरी या अत्यंत संवेदनशील भागात नियुक्ती देण्यात आली होती. सध्या ते याच ठिकाणी कार्यरत आहेत.

Back to top button