बीड : जहाजावरून बेपत्‍ता युवकाच्या शोधासाठी मुंडे बंधू-भगिनींचे परराष्‍ट्र मंत्रालयाकडे मदतीसाठी प्रयत्‍न | पुढारी

बीड : जहाजावरून बेपत्‍ता युवकाच्या शोधासाठी मुंडे बंधू-भगिनींचे परराष्‍ट्र मंत्रालयाकडे मदतीसाठी प्रयत्‍न

परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा परळी तालुक्यातील इंजेगावचा युवक सिंगापूर- इंडोनेशिया दरम्यान जहाजातून बेपत्ता झाला आहे. या घटनेमुळे त्याचे कुटुंबीय चिंताग्रस्त बनले आहे. सर्वच प्रसार माध्यमांमध्ये प्राधान्याने ही बातमी प्रसारित झाली आहे. कराड कुटुंबाला प्रणव चा शोध घेण्यासाठी मदत व्हावी या दृष्टीने सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. या अनुषंगाने राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी प्रधानमंत्री कार्यालय, परराष्ट्र मंत्रालय आदी संबंधित ठिकाणी पाठपुरावा सुरू केला आहे. प्रणव कराडचा शोध घेण्यासाठी मदतीचे आवाहन त्यांनी ट्विट करून केले आहे.

सध्या पुण्यात राहत असलेला मात्र मुळ परळी वैजनाथ तालुक्यातील इंजेगावचा प्रणव कराड नावाचा तरुण जहाजावरुन बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. हा तरुण मर्चंट नेव्हीमध्ये एका कंपनीच्या जहाजावर काम करत होता. मात्र आता तो अचानक बेपत्ता झाल्याची माहिती प्रणवच्या कुटुंबियांना देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे प्रणवचे कुटुंबीय फार चितेत आहेत. तसेच या संदर्भात अधिक माहितीसाठी कंपनीकडून माहितीसाठी समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत चिंताग्रस्त असलेल्या कराड कुटुंबियांनी व्यक्त केली होती. विल्हेम्सन शिप मॅनेजमेंट प्रायवेट लिमिटेड या कंपनीत प्रणव काम करत होता. कंपनीच्या जहाजावर प्रणव डेट कॅडेट म्हणून काम करायचा. गेल्या तीन दिवसांपासून प्रणव बेपत्ता असल्याचं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे.

मुंबईतल्या कंपनीने प्रणवचा शोध सुरू केला आहे. मात्र प्रणव बेपत्ता असल्याची माहिती दिल्यानंतर आतापर्यंत मुंबईतील कंपनीने कोणतीही समाधानकारक माहिती दिलेली नाही, असं त्याचे वडिल गोपाळ कराड यांनी सांगितले. सर्वच प्रसार माध्यमांमध्ये प्राधान्याने ही बातमी प्रसारित झाली असुन, प्रणव कराडचा शोध लागावा व या कुटुंबाला मदत व्हावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगानेच बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी काल ही माहिती मिळाल्यापासूनच प्रयत्न सुरू केले असुन प्रणवचा शोध घेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी ते पाठपुरावा करत आहेत.

त्याचबरोबर पीएमओ, परराष्ट्र मंत्रालय आदी संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी याबाबत मदतीसाठी ट्विटही केले आहे. त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनीही कालपासूनच कराड कुटुंबीयांच्या मदतीसाठी संपूर्ण माहिती घेऊन पी एम ओ व परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित यंत्रणांची या कुटुंबाला मदत मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनीही ट्विट करून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान या संबंधित यंत्रणा, संबंधित कंपनी व पोलीस आदींकडून सुरूवातीला प्रणव कराडचा शोध घेण्याबाबत तितकासा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र सर्व प्रसारमाध्यमांतून पुढे आलेला हा मुद्दा आणि आता धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने संबंधित यंत्रणा सक्रिय होऊन लवकरच प्रणव कराडच्या बाबतीत शोधाबाबतची सकारात्मक माहिती समोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button