लातुर : उन्हाळ्यात भीषण चारा टंचाईची शक्यता; पाणी समस्याही गंभीर | पुढारी

लातुर : उन्हाळ्यात भीषण चारा टंचाईची शक्यता; पाणी समस्याही गंभीर

छत्रपती संभाजीनगर : लातूर जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना भीषण चारा टंचाईला सामोरे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पिकांमुळे सध्या चारा टंचाईच्या झळा जाणवत नसल्या तरी एप्रिलनंतर हिरवा चारा तर सोडा वाळलेला चाराही जनावरांना मिळणार नसल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या 

जिल्ह्यातील आठही धरणात केवळ 14 टक्के जलसाठा असल्यामुळे जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील पेटणार आहे. 2016 साली उन्हाळ्यात लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची वेळ राज्य शासनावर येऊन ठेपली होती. त्यामुळे यंदा राज्य शासन लातूरकरांसाठी धावून जाणार का हा मोठा प्रश्न आहे.

पावसाच्या दडीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उत्पादनात तर यामुळे घट झालीच आहे. शिवाय आता जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे. फेब्रुवारीपासूनच शेतकऱ्यांना जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सतावत आहे. जिल्ह्यात कडब्याची एक पेंडी 35 रुपयांवर गेली आहे. तर दुसरीकडे पावसाअभावी हिरवा चारा गायबच झाला आहे.

खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांमुळे चाऱ्यातून जनावरांची भूक भागेल, पण त्यानंतर जुलैपर्यंत जनावरांसाठी चारा कसा पुरविला जाईल, असा प्रश्न शेतकरी आणि प्रशासनासमोर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ज्वारी वैरण बियाणांचे वाटप शेतकऱ्यांना केले जात आहे. जिल्ह्यातील जनावरांची संख्या 6 लाख 98 हजार 686 एवढी आहे. त्यांना दिवसागणिक 2 हजार 809 मेट्रिक टन चाऱ्याची आवश्यकता आहे. याशिवाय 1 कोटी 75 लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. खरीप आणि रब्बी हंगामातील 10 लाख 51 हजार 718 मेट्रिक टन चारा एप्रिलपर्यंत पुरेल असा अहवाल जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिला आहे.

तर यानंतर भासणाऱ्या टंचाईसाठी ज्वारी वैरण बियाणांचे शेतकऱ्यांना वाटप केले जात आहे. त्यासाठी दोन कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

16 लाखांच्या निधीची आवश्यकता…

लातुरातील आठही धरणातील जलसाठा अवघ्या 14 टक्क्यांवर आला आहे. मराठवाड्यात दुष्काळ असल्याची घोषणा करताना 15 डिसेंबर रोजी पैसेवारी जाहीर करण्यात आली. यात लातूर जिल्ह्यातील 952 गावांना 47.42 एवढी पैसेवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र ही पैसेवारी अजूनही शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही. तर याच जिल्ह्यातील 655 शेतकरी बाधित आहेत. त्यांचे 188.89 एकत्रित बाधित क्षेत्र आहे. त्यासाठी 16 लाख 16 हजारांच्या निधीची अपेक्षा आहे.

पाणी समस्याही गंभीर, आठही धरणात 14 टक्के जलसाठा

जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती  प्रकल्प टक्केवारी व्हटी
रेणापूर                            00
तिरू                         13.71
देवर्जन                            00
साकोळ                         18.34
धरणी                            24.84
मसलगा                           20.11

Back to top button