Parbhani News: बालाजी गायकवाड यांच्या बदलीच्या आश्वासनानंतर चारठाणा येथील गणपतींचे विसर्जन होणार | पुढारी

Parbhani News: बालाजी गायकवाड यांच्या बदलीच्या आश्वासनानंतर चारठाणा येथील गणपतींचे विसर्जन होणार

जिंतूर: पुढारी वृत्तसेवा : सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांची चौकशी करून पंधरा दिवसांत बदली केली जाईल, असे आश्वासन उपविभागीय पोलिस अधिकारी गोफणे यांनी आज (दि.२९) दिले. त्यानंतर चारठाणा येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. (Parbhani News)

सहायक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड अधिकाराचा गैरवापर करून चारठाणा गावातील तरुणांना वारंवार कायद्याचा धाक दाखवून धमकावत आहेत. गणपती विसर्जनच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही गावांतील तरुणांना व लोकप्रतिनिधींना विनाकारण १४९ च्या नोटीसा पाठविल्या आहेत. त्यामुळे गावातील तरुणांनी एकत्र बैठक घेऊन जोपर्यंत बालाजी गायकवाड यांची बदली होत नाही, तोपर्यंत आम्ही सार्वजनिक गणपतींचे विसर्जन करणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. (Parbhani News)

अखेर उपविभागीय पोलिस अधिकारी गोफणे यांनी गावात येऊन तरुणांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. तुम्ही आनंदाने गणपती विसर्जन करा, मी पंधरा दिवसांत तुमच्या तक्रारींची चौकशी करून गायकवाड यांची बदली करतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर नानासाहेब राऊत यांनी युवकांना मार्गदर्शन करून गणपती विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. या बैठकीला प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकारी करणे, किरण देशमुख आदीसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button