छत्रपती संभाजीनगर : कन्नडमध्ये बिबट्याच्या मृत्युप्रकरणी शेतकऱ्यास तीन दिवसांची वनकोठडी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : कन्नडमध्ये बिबट्याच्या मृत्युप्रकरणी शेतकऱ्यास तीन दिवसांची वनकोठडी

कन्नड; पुढारी वृत्तसेवा : शेताच्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडून बिबट्याच्या मृत्युस कारणीभूत ठरल्याप्रकरणी धोंडीराम शिवराम पवार (वय ५०) या शेतकऱ्यास न्यायालयाने तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. संबंधित शेतकऱ्यांने नेमके कशासाठी हे केले याचा उलगडा लवकरच होईल, असे वनक्षेत्रपाल साळुंखे यांनी याप्रकरणी बोलताना स्पष्ट केले.

तालुक्यातील चापनेर शेवारात सोमवारी (दि.३१) हा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला होता. याची माहिती मिळताच वन विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृत बिबट्याची सहायक पशु संवर्धन आयुक्त डॉ.डी.जे.गांधले, डॉ.व्ही.ए.मोखाडे,, बाजीराव राडोड या पथकाने शवचिकित्सा केली. हा बिबट्या नर जातीचा असून साधारणतः दहा महिने वयाचा होता. तो उपाशी पोटी होता. प्रथम दर्शनी बिबटाचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असल्याचा अंदाज आहे. त्याचा शवविच्छेदन निष्कर्ष न्यायवैद्यक प्रयोगशाळेतूनच अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. असे डॉ.गांधले यांनी यावेळी सांगितले.

शेताच्या कुंपणात वन्यप्राण्यांचा उपद्रव कमी व्हावा, यासाठी शेतकरी धोंडीराम पवार यांनी कुंपणात विद्युत प्रवाह सोडला होता. कुंपनातील विजेच्या धक्क्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याने धोंडीराम पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
याप्रकरणी पवार यांना कन्नड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावली आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर मृत बिबट्यावर मंगळवारी (दि.१ ) मकरणपूर नर्सरीत भडाग्नी देऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सहायक वनसंरक्षक राजेंद्र नाळे, वनक्षेत्रपाल रोहिणी साळुंखे, वनपाल रफिक पठाण, एस.पी. काजी, वनरक्षक राजेश महाजन, आजिनाथ नागरगोजे, विलास सपकाळ, योगेश साळवे, अनुसया चव्हाण, मानद वन संरक्षक राजेंद्र ठोंबरे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button