नाशिक : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूकीचे आमीष दाखवून सव्वा तीन लाखांना गंडा

‘क्रिप्टोकरन्सी’
‘क्रिप्टोकरन्सी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमीष दाखवून एका भामट्याने नागरिकास सव्वा तीन लाख रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विष्णुकुमार सुरेंद्रकुमार बेटकरी (५२, रा. वनश्री कॉलनी, अंबड) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे. बेटकरी यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने त्यांना १७ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला. बेटकरी यांच्याशी इन्स्टाग्रामवरून भामट्याने संपर्क साधला. क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळतो, असे आमीष दाखवून बेटकरी यांना गुंतवणूकीस प्रोत्साहित केले. त्यानुसार बेटकरी यांनी भामट्यास ३ लाख २५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने वर्ग केले. मात्र भामट्याने त्यांना गुंतवलेले पैसे किंवा परतावा दिलेला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बेटकरी यांनी सायबर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख हे तपास करीत आहेत.

सोशल मीडियातून संपर्क

पैसे कमवण्यासाठी अनेक जण शेअर मार्केट, क्रिप्टो करन्सीकडे आकर्षित होत आहे. नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या अज्ञानपणाचा गैरफायदा भामटे घेत असून त्यांना गुंतवणूकीस प्रोत्साहित करीत गंडा घालत आहेत. ऑनलाइन पद्धतीने टिप्स, माहिती देणाऱ्यांवर सेबीने बंदी घातलेली असतानाही भामटे सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना गंडा घालत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news