बीड: पावसाच्या हजेरीने नेकनूरच्या बाजारात तारांबळ | पुढारी

बीड: पावसाच्या हजेरीने नेकनूरच्या बाजारात तारांबळ

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : नेकनुरच्या आठवडे बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक दुकानात ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली असताना आज (दि.१८) सायंकाळी साडेपाच वाजता पावसाने हजेरी लावली. व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, पावसाच्या आगमनाने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान तरळले.

मृग नक्षत्र कोरडे जाते की काय या भीतीने आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना वरुणराजाच्या आगमनाने दिलासा मिळाला. मात्र, नेकनूरच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. शालेय साहित्य, कपडे, बूट चप्पल, बॅग, खत-बियाणे खरेदीसाठी ग्राहकांची बाजारात मोठी गर्दी होती. साडेपाच वाजता हवेसोबत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांसोबत व्यापाऱ्यांची धांदल उडाली.

अचानक आलेल्या पावसाने व्यावसायिकांची तारांबळ उडाली. जनावरांच्या बाजारात जनावरांना पावसाचा फटका बसला. दुकानात पाणी शिरले. मात्र, पावसाच्या आगमनाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान व्यक्त करणारा होता.

Back to top button