चला पर्यटनाला : राजूर, अंबड, तपोधाम, जाळीचा देव प्रेक्षणीय | पुढारी

चला पर्यटनाला : राजूर, अंबड, तपोधाम, जाळीचा देव प्रेक्षणीय

जालना; पुढारी वृत्तसेवा :  गणेशाचे पूर्णपीठ श्री क्षेत्र राजूर, संत रामदास स्वामींचे जन्मस्थान जांब समर्थ, अंबडची मत्स्योदरी देवी, जैनधर्मीयांचे गुरू गणेश तपोधाम, डोणगाव येथील दर्गा शरीफ आदी धार्मिक स्थळे जालना जिल्ह्यात पाहण्यासारखी आहेत. या ठिकाणी नेहमी गर्दी असते.

भोकरदन तालुक्यातील राजूर हे गणेशाचे पूर्ण पीठ म्हणून गणेश पुराणामध्ये मानले जाते. नवसाला पावणारा गणपती अशी या क्षेत्राची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत मंदिर परिसराचा चेहरामोहरा पार बदलला असून, नूतनीकरण झाले आहे. दर चतुर्थीला येथे भाविकांची मोठी गर्दी असते. महानुभावपंथीयांचे जाळीचा देव हे ठिकाण या जिल्ह्यात आहे. श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने जाळीचा देव अर्थात वालसावंगी परिसर पुनित झाला आहे. बदनापूर तालुक्यात असणारा सोमठाणा गड हे पर्यटकांसाठी आकर्षण. रेणुकादेवीचे मंदिर आणि हिरवा शालू नेसलेला सोमठाणा गड पाहण्यासारखा आहे. अंबड येथे मत्स्योदरी देवीचे मोठे मंदिर असून, नवरात्रातील उत्सव पाहण्यासारखा असतो. मासोळीसारख्या आकाराच्या डोंगरावर मंदिर आहे. अंबड येथे अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेले बारव इतिहासकालीन वैभवाची साक्ष देतात. अंबडजवळ समर्थ रामदासांची जन्मभूमी जांब रामभक्तांना खुणावत असते. याठिकाणी प्राचीन राम मंदिर असून मंदिरातील मूर्ती रामदास स्वामींनी स्थापित केल्या आहेत.

जैन धर्मातील बांधवांसाठी जालना शहरामधील गुरू गणेश भवन हे एक महत्त्वाचे पवित्र ठिकाण आहे. गुरू गणेश भवन हे कर्नाटक केसरी या नावाने देखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्टमार्फत या स्थळाची देखरेख व विकासाची कामे केली जातात. गोशाळा मराठवाड्यामध्ये सर्वात मोठी गोशाळा म्हणून ओळखली जाते. डोणगाव येथे दाऊदी बोहरा समाजाचे मौलाना नुरुद्दीन यांचा दर्गा आहे. नुरुद्दीन यांना वली अल-हिंद या पदावर दाऊदी बोहरा दावत, येमेन केंद्रातर्फे नियुक्त करण्यात आले होते. मौलया नुरुद्दीन हे शिक्षण घेण्यासाठी, कैरो, इजिप्त गेले होते. त्यांचा मृत्यू डोणगाव येथे झाला.

मंठा येथील देवीचे स्थान, शिल्पकलेचे प्रणेते हेमाद्रीपंत यांचे हेलस गाव, अन्वा येथे असलेले पुरातन हेमाडपंथी शिवमंदिर, जालन्यात असणारे मम्मादेवी मंदिर, माळ्यावरचा गणपती, दत्त धाम, आनंदीस्वामी मंदिर, रामानंद महाराजांनी बांधलेले राम मंदिर, काली मशीद आदी ठिकाणांनाही पर्यटक भेट देतात.

कसे जाल

रस्ते मार्ग सोयीचा : जालना हे दक्षिण मध्य रेल्वेचे महत्त्वाचे रेल्वेस्थानक. जालना येथे उतरून रस्ते मार्गाने स्थळांना भेटी देणे शक्य आहे. जालना व तालुकास्थानी हॉटेल, लॉजेस आहेत. मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमेवर जालना असल्यामुळे लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, साखरखेडा आदी ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना जालन्यातूनच जावे लागते.

Back to top button