उद्या नृसिंह जयंती : जाणून घ्या जन्मोत्सव सोहळ्याची वेळ; पोखर्णीत प्राचीन मंदिर | पुढारी

उद्या नृसिंह जयंती : जाणून घ्या जन्मोत्सव सोहळ्याची वेळ; पोखर्णीत प्राचीन मंदिर

परभणी; प्रवीण देशपांडे : परभणी तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे उद्या नृसिंह जयंती ( जन्मोत्सव ) सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील नृसिंह जन्मोत्सव सोहळा (देवजन्म ) उद्या म्हणजे, ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजून ५१ मिनिटांनी साजरा होणार आहे. ह. भ. प. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे देव जन्माचे किर्तन होणार आहे. तर गुलालाची उधळण करत व ‘नरहरी शामराज की जय’ चा जयघोषात भाविक जन्मोत्सव साजरा करणार आहेत. या जन्मोत्सव सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पोखर्णीमध्ये दाखल झाले आहेत.

नृसिंह जयंती या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांची निवास व भोजनाची व्यवस्था नृसिंह संस्थान व पोखर्णी ग्रामस्थांच्या वतीने मोफत करण्यात येते. मंदिर परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळ व्यवसायिक प्रतिष्ठान उभारले असून मंदिर परिसर मागील पाच दिवसांपासून यात्रेसारखा गजबजला आहे. लहान मुलांची खेळणी महाप्रसादाची दुकाने आदी व्यवसायिकांनी दुकाने थाटली आहेत.

महाराष्ट्रातील अनेक भाविकांचे हे कुलदैवत असून जाज्वल्य दैवत म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. नृसिंह देवतेची मुर्ती ही वालुकाश्म पाषाणाची असून हिरण्य कश्यपूचा वध करण्याच्या अविर्भावात आहे. रौद्ररुप असलेल्या या मूर्तीला भाविकांच्या दर्शनासाठी प्रवाळजडीत सुवर्ण विलेपन केलेला मुखवटा देवाला चढवलेला आहे. नृसिंह जन्मोत्सव सोहळ्यासाठी तयारी झाली असून मंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंदिर परिसराला मागील पाच दिवसापासून यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.

भाविकांसाठी पर्वणीच

श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील नृसिंह जन्मोत्सव सोहळा भाविकांसाठी मोठी पर्वणी असते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या दिवशी पोखर्णी येथे दाखल होतात. या सोहळ्यास उपस्थिती लावणे ही भाविकांसाठी व ग्रामस्थांसाठी मोठी पर्वणीच असते.

अभंगवाणी व पखवाज सोलो वादन

नृसिंह जन्मोत्सव सोहळा संपन्न झाल्यानंतर रात्री ९ वाजता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक नागेशजी आडगावकर पुणे यांचे गायन होणार आहे. तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पखवाज वादक मृदंगाचार्य पंडित दासोपंत स्वामी यांचे पखवाज सोलो वादन होणार आहे.

हेही वाचा : 

Back to top button