केडगावच्या रेल्वे पुलाखालील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर | पुढारी

केडगावच्या रेल्वे पुलाखालील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर

खोर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : केडगाव (ता. दौंड) येथील केडगाव स्टेशनच्या पुलाखालील सात मोर्‍यांच्या रस्त्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या रेल्वे पुलाच्या मार्गामधून जात असताना वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होत असून, केडगावकरांचा इसातत्याने भेडसावणारा हा प्रश्न कधी मार्गी लागणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जानेवारी 2007 मध्ये तत्कालीन आमदार रंजना कुल यांनी रस्त्याची पाहणी अधिकाऱ्यांसमवेत केली होती. त्यानुसार रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते. मात्र, या प्रलंबित रस्त्याचा प्रश्न त्या वेळी मार्गी लागला नाही. मध्यंतरीच्या काळात खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील केडगाव दौर्‍यादरम्यान या रस्त्याची पाहणी केली. त्या वेळीदेखील हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन त्यांनी केडगावकरांना दिले होते. मात्र, आजवर याकडे दुर्लक्ष होत आहे.

पावसाळ्यात येथे पाणी साचते. उंची कमी असल्याने मोठी वाहने हे उड्डाणपुलावरून जात असल्याने ते केडगाव गावात वळण घेत नसल्याने आज केडगाव बाजारपेठेवरदेखील त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे. मोरी क्रमांक एक व दोन या दुचाकीसाठी आहेत; मात्र त्या मोरीत संरक्षक लोखंडी खांब असल्याने हे खांब रात्रीच्या वेळी अनेकदा प्रवास करताना प्रवाशांच्या पायालादेखील लागले आहेत.

काही मोर्‍यांची उंची कमी असल्याने समस्या
केडगाव रेल्वे स्टेशन सात मोर्‍यांमधून हा रस्ता राहू, दहिटणे, वाळकी, देलवडी, खुटबाव, एकेरीवाडी, लडकतवाडी या गावांकडे जातो. या रेल्वे पुलाखालील पाच, सहा, सात मोर्‍यांची उंची कमी असल्याने मोठ्या गाड्या त्यातून जात नाहीत. एकेरी वाहतूक व्यवस्था तसेच पुलाखाली असलेली अडचण पाहता या पुलाखाली मोठी वाहतूक कोंडी होत असते.

Back to top button