Ravindra Tupkar : राज्यात उद्या ‘स्वाभिमानी’चा रस्ता रोको; रविकांत तुपकर यांचा सहभाग नाही | पुढारी

Ravindra Tupkar : राज्यात उद्या 'स्वाभिमानी'चा रस्ता रोको; रविकांत तुपकर यांचा सहभाग नाही

बुलढाणा; पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात उद्या (दि.२२) स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यात ठिकठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहे. परंतु, आंदोलनात आपण काही कारणामुळे सहभागी होऊ शकत नसल्याचे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी (दि.२१) पत्रकार परिषदेत सांगितले.

११ फेब्रुवारी रोजी तुपकर यांनी सोयाबीन व कपाशीला योग्य भाव आणि पीक विम्याचे रकमेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केल्याने पोलीसांनी तुपकर व त्यांच्या २५ सहकाऱ्यांना अटक केली होती. तसेच याप्रकरणी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती.

या प्रकरणात जामीन मंजूर करतांना न्यायालयाने रविकांत तुपकर यांना एक महिन्याच्या कालावधित कोणत्याही आंदोलनात सहभाग घेण्यास बंदी आणि जिल्ह्याबाहेर न जाण्याची अट घातली आहे. यामुळे उद्या (दि. २२) स्वाभिमानीच्या रस्ता रोकोत आपण सहभागी होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

आंदोलनातील मागण्या

थकीत बीलापोटी वीज जोडण्या खंडित करु नका, कृषी संजीवनी योजनेची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवा, शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे तातडीने द्या, बुलढाणा येथे स्वाभिमानीच्या आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करा, सोयाबीन, कपाशी, कांदा व द्राक्ष आदी पीकांचे बाजारात भाव पडलेले आहेत ते पूर्वस्थितीत येण्यासाठी शासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उद्या (दि. २२) आंदोलन पुकारले आहे.

शेतकरी संवाद यात्रा

बुलढाणा येथील आत्मदहन आंदोलनावेळी पोलीसांनी रविकांत तुपकर यांच्यासह आंदोलक शेतकऱ्यांवर अन्यायकारक लाठीचार्ज केला होता. याबाबत शेतकरी बांधवांना भेटून व्यथा मांडण्यासाठी एक महिन्यानंतर जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा येथून आपण जिल्ह्यातील गावागावात ‘शेतकरी संवाद यात्रा’ काढणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अॅड. शर्वरी तुपकर उपस्थित होत्या.

Back to top button