औरंगाबाद : धर्मांतर प्रकरणात अखेर गुन्हा दाखल | पुढारी

औरंगाबाद : धर्मांतर प्रकरणात अखेर गुन्हा दाखल

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : आंतरधर्मीय प्रेमवीराला धर्मांतरासाठी दबाव टाकून मारहाण, आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी अखेर क्रांती चौक पोलीस ठाण्यात २ डिसेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. प्रेयसीसह तिचे आई-वडील, काका आणि बहीण, अशा पाच जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे. आरोपींनी खंडणी मागितली, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि अपहरण केले, असे आरोप करण्यात आले आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सोनवणे याने याबाबत फिर्याद दिली आहे. त्याने २०१४ ते २०२० दरम्यान एमआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकल शाखेतून अभियांत्रीकीची पदवी घेतली. सुल्ताना (नाव बदललेले आहे) ही देखील त्याच कॉलेजमध्ये शिकायला होती. २०१८ मध्ये दीपकची आंतरधर्मीय प्रेयसी सुल्ताना हिच्यासोबत ओळख झाली. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. सुल्ताना हिने लग्नाचे आमिष दाखवून दीपककडून पैसे उकळले. दीपकने तिला ऑनलाइन आणि ऑफलाइन, असे ११ लाख रुपये दिले.

पैसे दिल्यानंतर सुल्तानाने दीपकला तुझ्याशी लग्न करते. मात्र, तू धर्मांतर कर, असा तगादा लावला. हा प्रकार दीपकने सुल्तानाच्या आई-वडिलांना सांगितला. ते तिला समजावून सांगतो म्हणाले. मात्र, मार्च २०२१ मध्ये तिच्या आई-वडिलांसह काका व बहिणीने दीपकला गुलमंडी येथे भेटायला बोलावले. तेथून सुल्तानाच्या कुटुंबियांनी दीपकला नारेगाव येथे नेऊन कोंडून ठेवले. हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबला. निर्वस्त्र करून माहराण केली. सुल्तानाच्या वडिलांनी दीपकच्या अंगावर लघुशंका करून त्याचा व्हिडिओ बनविला. तेथेच धर्मांतर कर म्हणून मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवर बसवून सिटी चौक ठाण्याच्या मागील गल्लीत आणून खतना केली. त्यानंतर त्यांनी त्याला गुलमंडी येथे आणून सोडले.

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

खतना केल्यावर दीपकने सुल्तानापासून दूर राहण्याचे ठरविले. मात्र, तिच्यासह तिची आई घरी येऊन व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी करू लागले. गंभीर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे दीपकने तिला रोख सात लाख आणि ऑनलाइन चार लाख, असे ११ लाख रुपये दिले. त्यांनी २५ लाख रुपये मागितल्याचा आरोप केला आहे. पैसे न दिल्यामुळे २९ सप्टेंबर २०२१ रोजी एमआयडीसी सिडको ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.

तडजोडीचा बाँड बळजबरी घेतल्याचा आरोप

सुल्ताना हिचे जानेवारी २०२२ मध्ये लग्न झाले. मात्र, हे लग्न मोडून तुझ्यासोबत लग्न करते, असे आमिष दाखवून तिने दीपककडून फेब्रुवारी ते ऑगस्ट २०२२ या कलावधीत ऑनलाइन एक लाख ७० हजार रुपये घेतले. तसेच, क्लाऊड कॅम्पस येथे बोलावून घेत धर्मगुरूंची भाषणे ऐकायला लावून धर्मांतर करण्यासाठी तगादा लावला. त्यांचे न ऐकल्यावर जातीवाचक शिवीगाळ केली. २१ मार्च २०२२ ला औरंगपुरा येथून उचलून बळजबरी कोर्टात नेऊन तडजोडीचे शपथपत्र लिहून घेतले. तेव्हाच जवळचे एक लाख ३० हजार रुपये काढू घेतले, असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल ढुमे करीत आहेत.

पुरवणी जबाबात खासदारांचे नाव, भाजपाचा दावा

दीपक सोनवणे या प्रेमवीराचा धर्मांतरासाठी आंतरधर्मीय प्रेयसीसह तिच्या कुटुंबियांनी छळ केल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. खासदारांसह त्यांच्या टीमकडून मारहाण झाल्याचा आरोप सोनवणेने केला होता. एफआयआरमधील आरोपींमध्ये खासदारांच्या नावाचा उल्लेख नाही, परंतु पुरवणी जबाबात त्यांचे नाव घेतल्याचा दावा भाजपा अनुसुचित जाती मोर्चा सरचिटणीस जालिंदर शेंडगे यांनी केला आहे. पोलिसांकडून मात्र याला दुजोरा मिळाला नाही.

हेही वाचलंत का?

Back to top button